बीड : प्रतिनिधी
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठिंबा दिला जाणार नाही. पुढील निर्णय लवकरच पक्षाचे अध्यक्ष अजित पवार जाहीर करतील. न्याय मिळवणे आमची भूमिका आहे आणि चुकीच्या कृत्याला आम्ही समर्थन देणार नाही.
दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाढत्या दबावामुळे अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा जवळचा सहकारी वाल्मिक कराड याच्या या प्रकरणातील सहभागामुळे सरकारवर मोठा तणाव निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य करताना सांगितले, धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपुर्द केला असून, मी तो स्वीकारला आहे. पुढील कारवाईसाठी तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हीडीओ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झाल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा गाजू लागले. त्यामुळे विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या विषयावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र आता मुंडेंच्या या राजीनाम्यानंतर पक्षाची पुढील दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.