मुंबई : प्रतिनिधी
मुंबईपासून काही अंतरावर असणा-या भिवंडीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी म्हणजेच २० नोव्हेंबर २०२० रोजी अचानक बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय शोएब शेखच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य अखेर उलगडले आहे. ठाणे क्राईम सेलने या प्रकरणात एक धक्कादायक कारवाई करत मौलवी गुलाम रब्बानी शेख याला अटक केली आहे. या मौलवीने शोएब शेखची निर्घृणपणे हत्या केली होती आणि त्याच्या शरीराचे छोटे-छोटे तुकडे करून काही कच-यात फेकले होते तर काही अवशेष स्वत:च्या किराणा दुकानात गाडून टाकले होते. ही घटना अक्षरश: एखाद्या थरारक चित्रपटात घडावी अशी असून अनेकांना अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाची आठवण करून देणारी आहे.
शोएब शेख हा भिवंडीच्या नवी बस्ती, नेहरूनगर भागात आपल्या कुटुंबासोबत रहात होता. घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्रेम त्याच्यावर होते. २० नोव्हेंबर २०२० रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याच्या अपहरणाची तक्रार भिवंडी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनाही शोधकार्य करण्यात अपयश येत होते.
गुलाम रब्बानी शेख हा नेहरूनगरमधील एका मशिदीत अजान देण्याचे काम करत होता, त्याचबरोबर तो बाबागिरी करायचा आणि किराणा दुकानही चालवत होता. त्याच्या दुकानात एका अल्पवयीन मुलाला देखील कामावर ठेवले होते. पण याच दुकानात तो अल्पवयीन मुलांसोबत तो दुष्कृत्य करत असल्याची माहिती पुढे आली. हे कुकर्म शोएबने पाहिले होते आणि तो हा प्रकार सर्वांना सांगेल या भीतीने मौलवीने त्याला गप्प राहण्यासाठी सांगितले होते. त्याबद्दल मौलवी शोएबला पैसे देत होता. परंतु काही दिवसांनी शोएब शेखची मागणी वाढत जाऊन त्याने दुकानातून सामान घेऊन पैसे देणेही बंद केले होते आणि नंतर मौलवीकडून पैसे उकळायला सुरुवात केली होती. याला कंटाळून मौलवीने एक दिवस शोएबला दुकानात बोलावून त्याचा गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह दुकानातच गाडून टाकला.
आठ महिन्यांनंतर जेव्हा गाडलेल्या शवाचा काही भाग जमिनीतून बाहेर यायला लागला, तेव्हा मौलवीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून, दुकानात काम करणा-या दुस-या अल्पवयीन मुलाच्या हातून ते कच-यात टाकून दिले. त्यानंतर उरलेले शव पुन्हा गाडून वर टाईल्स बसवल्या. या संपूर्ण प्रकरणात मौलवी शोएबच्या कुटुंबाला खोटी आश्वासने देत राहिला. कधी अजमेर शरीफच्या नियाजचा सल्ला, कधी बक-याची बली, या सगळ्या उपायांमधून तो कुटुंबाला फसवत राहिला. दोन वर्षे हा प्रकार चालू होता. २०२३ मध्ये अचानक शोएबच्या आईला कोणीतरी सांगितलं की तिच्या मुलाचा खून अजान देणा-या मौलवीनेच केला आहे. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
चौकशी सुरू असताना मौलवी गुलाम रब्बानी शेख हा गर्दीचा फायदा घेत पोलिस ठाण्यातून फरार झाला होता. या मौलवीने ज्या अल्पवयीन मुलावर अत्याचार केले होते त्या अल्पवयीन मुलाने देखील २०२३ मध्ये या मौलवीविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फरार झालेला मौलवी दिल्लीमार्गे उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात गेला आणि तिथे ओळख बदलून एका मशिदीत पुन्हा मौलवी म्हणून काम करू लागला. उत्तराखंडमध्ये एका वादात त्याने ‘मी कित्येकांना कापून गाडलं आहे’ असे धमकीवजा विधान केले, आणि त्याच्या माहितीचा शोध घेतल्यावर तो भिवंडीचा वॉण्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलच्या टीमने मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे उत्तराखंडमध्ये पोहोचून मौलवी गुलाम रब्बानी याला अटक केली.