लातूर : प्रतिनिधी
नवविकसित एस. टी. को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बेमोसमी पावसातच अनेक नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पक्के बांधकाम केलेली घरे सोडताही येत नाहीत. व मनपा सांडपाणी व नालीच्या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावीत नसल्याने नागरिकांना जगणेदेखील कठीण झाले आहे.
उषाकीरण थिएटर बार्शी रोडपासून पावसाचे पाणी उतार रस्त्याने वाहून येते व एस. टी. कॉलनीत मार्ग सापडेल त्या घरात घुसते. गेल्या पंचवीस वर्षपासून येथील नागरिक हे सर्व सहन करीत दिवस काढीत आहेत. त्यातच रस्त्यांची निर्मिती करता खोदकाम न करता थरावर थर टाकून दर दोन पाच वर्षांनी रस्ते बनविल्याने घरे खोलगट भागात जावून रस्ते उंच झाल्याने प्रत्येकाच्या घरात घाण मैलायुक्त पाणी व त्यासोबत साप, विंचू आणि धामीण यासारखे विषारी प्राणीही घुसत आहेत. २२ एप्रिल रोजी दशरथ हुलसुरे व काशिनाथ अंबाड यांनी मनपा प्रभारी आयुक्त जाधव यांची भेट घेवून पावसाळा सुरु होण्यापूर्वी वसाहत नाली रस्ते दुरुस्तीचे निवेदन दिले होते. काम थातूर-माथूर केले. ११ मे रोजी झालेल्या बेमोसी पावसाने एस. टी. कॉलनीत हाहाकार उडाला. मनपा प्रशासनाने याची दखल घ्यावी अन्यथा मनपासमोर उपाषेण करण्यात येईल, असा इशारा एस. टी. कॉलनी रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.