मुंबई : वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमचा अख्खा देश आभारी आहे. मेरी कोमच्या नावावर तब्बल आठ जागतिक अजिंक्यपदे आहेत. ४२ वर्षांची बॉक्सिंग आयकॉन मेरी कोम तिच्या बॉक्सिंग स्किल्समुळे नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या ती तिच्या वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत आली आहे. मेरी कोम आपल्या पतीसोबतच्या सुखी संसारातून काडीमोड घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.
भारताची महान बॉक्सर एमसी मेरी कोम आणि तिचा पती करूंग ओंखोलर (ऑनलर) यांच्यात सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याचे सांगितले जात आहे. नात्यात सातत्याने होणा-या वाद-विवादानंतर आता दोघांनीही सुखी संसार मोडण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मेरी कोम ही बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी खेळाडू आहे. तिने २० वर्षांपूर्वी ऑनलरशी आपली लग्नगाठ बांधली होती. दोघांनी अद्याप घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केलेली नाही. पण, लवकरच दोघेही कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करून एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचे सांगितले जात आहे.
२०२२ पासून दोघांच्या नात्यात तणाव
‘हिंदुस्थान टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, दोघांच्या नात्यात २०२२ पासून तणाव सुरू असल्याची माहिती मिळत आहे. २०२२ च्या मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ऑनलर उतरला होता. पण, या निवडणुकीत त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी कुटुंबाला मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला होता. मीडिया रिपोर्टस्नुसार, बॉक्सर मेरी कोम आणि तिची चार मुलं फरिदाबादमध्ये राहतात. तर, तिचा पती ऑनरल कुटुंबातील काही सदस्यांसह दिल्लीत राहतो.