24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयबॉम्बच्या अफवा पसरवणा-यांवर विमान प्रवास बंदी लादली जाणार

बॉम्बच्या अफवा पसरवणा-यांवर विमान प्रवास बंदी लादली जाणार

नवी दिल्ली : देशातील विमानतळ आणि विमान कंपन्यांना सतत बॉम्बच्या धमक्या येत असताना नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) कठोर निर्णय घेतला आहे. नियामक संस्था खोट्या धमक्या देणा-या व्यक्तींना ५ वर्षांसाठी विमान प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. बीसीएएसशी संबंधित एका अधिका-याने सांगितले की, गेल्या काही महिन्यांत बॉम्बच्या खोट्या धमक्या देण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे संस्था खोडकर लोकांवर कारवाई करण्याचा विचार करत आहे.

सूत्रांच्या मते, विमानतळ आणि विमान कंपन्यांना खोटी माहिती दिल्याबद्दल देशभरातून आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. तर मेरठमधील एका अल्पवयीन मुलाने दिल्ली विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्याला बाल न्याय मंडळासमोर समुपदेश करून सोडण्यात आले आहे. खोट्या अफवांमुळे प्रवासी आणि सुरक्षा यंत्रणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे संघटनेच्या अधिका-यांनी सांगितले.

आतापर्यंत ४१ विमानतळांना मिळाल्या धमक्या
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, लखनौ, वाराणसी, कोईम्बतूर, वडोदरा, जयपूर, नागपूर, पुणे, पाटणा आणि जबलपूरसह देशातील सुमारे ४१ विमानतळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, तपासादरम्यान या धमक्या खोट्या असल्याचे समोर आले आहे. अफवेमुळे अनेक विमानांना उशीर झाला, तर अनेक विमाने आपत्कालीन परिस्थितीत अन्य विमानतळांवर वळवण्यात आली.
शिवाय सुरक्षा दलावर तपासाचा अतिरिक्त भारही पडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR