23.8 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeलातूरबोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके

बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून आता खरीप पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बोगस बियाणे, खतांची विक्री होवू नये, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून काम करावे. यासाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी येथे दिल्या. बियाणे, खते हा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून यावरच त्यांचा संपूर्ण खरीप हंगाम अवलंबून असल्याने चांगल्या दर्जाची बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आयोजित कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठकीत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी  सुभाष झोले यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. पेरणी सुरु झाल्यानंतर बियाणे, खतांची मागणी वाढणार असून या काळात शेतक-यांची अडवणूक, फसवणूक होवू नये, यासाठी खबरदारी घ्यावी. बोगस बियाणे, खतामुळे शेतक-यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया जावू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्री होवू नये, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहावे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकानिहाय पथके स्थापन करुन त्यांच्यामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. तसेच आपण स्वत: कृषी सेवा केंद्रांची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात फळबाग लागवड, बांबू लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणा-या अनुदानाची  माहिती देवून अधिकाधिक क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सव आयोजित करुन सीताफळ उत्पादक शेतक-यांचा गौरव करावा. तसेच तृणधान्य लागवडीसाठीही शेतक-यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR