लातूर : प्रतिनिधी
लातूरचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दि. २१ मे रोजी मुंबई येथे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांकडे आणि मांजरा नदीवरील बोरगाव-अंजनपूर बंधा-याच्या दुरुस्तीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. यावर त्वरित कार्यवाही करुन तो मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.
मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील एका निम्न पातळी बंधा-याचे स्वयंचलित दरवाजे पुरामुळे मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले आहेत. यामुळे पाणीसाठा अपेक्षित प्रमाणात होत नाही आणि शेतक-यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी धिरज देशमुख यांनी जलसंपदामंर्त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, गोदावरी मुळी बंधा-याच्या धर्तीवर या क्षतिग्रस्त बंधा-यालाही उभ्या उचल पद्धतीचे नवे दरवाजे बसवण्याची मागणी करण्यात आली. तसेच, या दुरुस्ती कामाच्या अंदाजपत्रकाला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून द्यावी, अशी आग्रही विनंतीही देशमुख यांनी यावेळी केली. माजी आमदार धिरज देशमुख यांच्या मागणीची दखल घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिका-यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या प्रश्नावर त्वरित कार्यवाही करून तो मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. मंत्र्यांनी त्वरित प्रतिसाद दिल्याने बंधा-याच्या दुरुस्तीचे काम लवकर मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.