24.8 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeअंतरराष्ट्रीयब्रिटनमध्ये सत्तांतर, सुनक यांना धक्का

ब्रिटनमध्ये सत्तांतर, सुनक यांना धक्का

लेबर पार्टीकडून अबकी बार ४०० पार
लंडन : वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत लेबर पार्टीने अबकी बार ४०० पारचा आकडा पार करीत तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. किएर स्टार्मर यांच्या नेतृत्त्वातील लेबर पार्टीने ४१२ जागा जिंकल्या तर ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला १२२ जागा मिळाल्या आणि लिबरल डेमोक्रॅटसला १९२३ नंतर प्रथमच सर्वाधिक ७१ जागा मिळाल्या. ब्रिटनच्या संसदेची सदस्यसंख्या ६५० आहे. स्कॉटिश नॅशनल पार्टीला १० आणि इतर छोट्या पक्षांना मिळून ३१ जागा मिळाल्या.

ब्रिटनमधील मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी या निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारला. कन्झर्वेटीव्ह पक्षाची या निवडणुकीत मोठी घसरण झाली. किएर स्टार्मर यांच्यावर विविध देशांच्या प्रमुखांनी या विजयाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला. लेबर पार्टीने १९९७ नंतर पुन्हा एकदा चारशे जागांचा टप्पा पार केला. लेबर पार्टीला १९९७ मध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी पक्षाचे नेते टोनी ब्लेअर होते. पक्षाने त्यावेळी ४१९ जागा मिळवल्या होत्या तर हुजूर पक्षाला १६५ जागा मिळाल्या होत्या. ६५० सदस्यांच्या ब्रिटनच्या संसदेत बहुमतासाठी ३२६ जागांची आवश्यकता असते. लेबर पार्टी आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुनक यांनी राजीनामा दिला.

या निवडणुकीत मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी विजय मिळविला तर माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना वेस्ट नॉरफॉकमधून पराभव स्वीकारावा लागला. लिझ ट्रस यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये पंतप्रधानपद स्वीकारले होते. मात्र, पुढच्या ६ महिन्यांच्या आतच त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. ऋषी सुनक यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड आणि नॉर्थालर्टनेमधून ४७.५ टक्के मते मिळवत विजय मिळवला.

ऋषी सुनक यांनी
स्वीकारला पराभव
ब्रिटनच्या निवडणुकीत झालेला पराभव ऋषी सुनक यांनी स्वीकारला. निवडणुकीतील हुजूर पक्षाच्या खराब कामगिरीची जबाबदारी ऋषी सुनक यांनी घेतली तर किएर स्टार्मर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला
ब्रिटनमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले. ब्रिटनमध्ये ६५० पैकी लेबर पार्टीला ४३१ जागा तर हुजूर पक्षाला १०२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. तो अंदाज जवळपास खरा ठरला.

हुजूर पक्षाने गमावली
१४ वर्षांनंतर सत्ता
हुजूर पक्षाला तब्बल १४ वर्षांनंतर सत्ता गमवावी लागली. या दरम्यान ५ पंतप्रधानांनी काम केले. डेविड कॅमेरुन, टेरेसा मे, बोरिस जॉनसन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनक पंतप्रधान बनले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR