वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
चीनविरोधात टॅरिफची घोषणा केल्यानंतर, शी जिनपिंग यांनीही प्रत्युत्तरात अमेरिकेविरोधात टॅरिफची घोषणा केली. एवढेच नाही तर, आता धमक्या आणि आणि ब्लॅकमेलिंगने चीनचा सामना केला जाऊ शकत नाही, असे चीनने म्हटले आहे. तर, डोनाल्ड ट्रम्प यांनी मवाळ भूमिका घेत, शी जिनपिंग हे अत्यंत हुशार (स्मार्ट) असल्याचे म्हटले.
यासंदर्भात बोलताना चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी म्हटले आहे की, बिजिंग वॉशिंग्टनसोबत चर्चा करण्यास तयार आहे, मात्र ही चर्चा परस्पर आदर आणि सन्मानाने व्हायला हवी. मंत्रालयाचे प्रवक्ते ही योंगकियान म्हणाले, दबाव, धमक्या आणि ब्लॅकमेलिंग हे चीनचा सामना करण्याचे योग्य मार्ग नाहीत.
चीनसंदर्भात मवाळ भूमिका घेत ट्रम्प म्हणाले, शी जिनपिंग हे स्मार्ट व्यक्ती आहेत आणि आम्ही चांगली डील करू. यावेळी शी जिनपिंग हे जगातील सर्वात चतुर व्यक्तींपैकी एक असल्याचेही ते म्हणाले. पत्रकारांसोबत बोलताना ट्रम्प म्हणाले, शी एक असे व्यक्ती आहेत, ज्यांना काय करायला हवे, हे चांगल्या प्रकारे समजते आणि त्यांचे आपल्या देशावर खूप प्रेम आहे. तसेच, आपण थेट शी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहोत. कोणत्याही क्षणी एक फोन येईल आणि त्यानंतर ही शर्यत संपुष्टात येईल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिका-चीन टॅरिफ वॉर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३ एप्रिलला चीन विरोधात ३४ टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर ३४ टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर १०४ टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ ३४ टक्क्यांवरून वाढवून ८४ टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, १० एप्रिलपासून लागू झाला आहे.