इमारत जमीनदोस्त, कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भंडारा : प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील आयुध निर्माण करणा-या कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत ८ कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर ५ जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली असून, स्लॅबचे तुकडे विखुरले आहेत. तसेच पत्रेदेखील सुमारे पाचशे ते सातशे मीटर अंतरावर जाऊन पडले आहेत. स्फोटानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करण्यात आले. दरम्यान, प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार आयुध निर्माण कारखान्यात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात जवळची इमारत जमीनदोस्त झाली असून, इमारतीवरील पत्रे आणि स्लॅबचे तुकडे दूरवर फेकले गेले. या स्फोटात ८ कामगार ठार झाले असून, इमारतीच्या स्लॅबच्या ढिगा-याखाली काही कामगार अडकल्याचे सांगण्यात आले. परंतु तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आणि ५ जखमींना बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एनडीआरएफ, एसडीआरएफला पाचारण करण्यात आले. याशिवाय अग्निशामक दलही दाखल झाले. त्यांच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले. घटनास्थळावर अग्निशमन पथक पोलिस विभाग, तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, या स्फोटाच्या घटनेनंतर कामगारांच्या नातेवाईकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, कारखान्याच्या सुरक्षेचा भाग म्हणून नातेवाईकांना आतमध्ये सोडले जात नसल्याने परिसरात नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
या अगोदर याच आयुध निर्माण कंपनीत (ऑर्डीनेस फॅक्टरी) गतवर्षीही जानेवारी महिन्यातच म्हणजे २७ जानेवारी २०२४ मध्ये भीषण स्फोट झाला होता. त्यात एक कर्मचारी ठार झाला होता. कंपनीतील सी एक्स विभागात हा स्फोट झाला होता. त्यानंतर वर्षभरानंतर दुसरा स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
४ किलोमीटरपर्यंत आवाज
या स्फोटाची भीषणता इतकी होती की, त्याचा आवाज जवळपास ३-४ किलोमीटरपर्यंत गेला. नागरिक भयभीत होऊन रस्त्यावर थांबले, तर काही जण घराबाहेर धावले. भंडारा शहराजवळील जवाहरनगर परिसरात सरकारचा आयुध निर्माण कारखाना आहे. त्यामुळे नागरिक भयभित झाले.
जखमींना तातडीने
रुग्णालयात हलवले
या स्फोटाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवाहरनगरातील आयुध निर्माण कारखान्यातील सी सेक्सनमध्ये हा भीषण स्फोट झाला. या कंपनीत दारू गोळा तयार करण्यात येतो.
तज्ज्ञांची पथके दाखल
आयुध कारखान्यात स्फोट कसा झाला, हे लगेचच स्पष्ट होणे कठीण आहे. त्यामुळे स्फोटाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले असून, नागपुरातून सेंट्रल फॉरेन्सिक टीमसह संबंधित तज्ज्ञांची पथके दाखल झाली असून, स्फोटाच्या कारणाचा शोध घेतला जात आहे, असे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले.