20.2 C
Latur
Monday, January 12, 2026
Homeमहाराष्ट्रभंडा-यात उल्का वर्षाव?

भंडा-यात उल्का वर्षाव?

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भंडारा : प्रतिनिधी
जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या परसोडी परिसरात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, हे तुकडे ‘उल्का’ असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या दरम्यान घडली. परसोडी गावाजवळील एका मोकळ्या ले-आउटमध्ये काही मुले शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करत बसली होती. अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचे मुलांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच सिमेंटच्या रंगाचे दोन तुकडे वेगाने जमिनीवर पडले.

सुदैवाने, हे तुकडे मुलांपासून काही अंतरावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली.हे तुकडे दिसायला सिमेंटसारख्या राखाडी रंगाचे आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी (हलके) असल्याचे सांगण्यात येत आहे.पडताना हे तुकडे पेट घेत असल्यासारखे दिसत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला नाही.

स्थानिक नागरिक किशोर वाहने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली आणि ११ जानेवारी रोजी हे दोन्ही तुकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले.खगोलीय अभ्यासकांच्या मते, हे तुकडे अवकाशातून आलेली उल्का असू शकतात. मात्र, त्यांचे वजन हलके असल्याने ते नैसर्गिक उल्का आहेत की मानवनिर्मित अंतराळ कचरा याचा शोध घेणे आवश्यक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR