भंडारा : प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार ठिकठिकाणी वादळी वा-यासह पाऊस व गारपीट होत आहे. दरम्यान मागील सात दिवसांपासून भंडा-यात वादळी वारा आणि गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रचंड वेगाने वाहणा-या वादळामुळं हातातोंडाशी आलेले उन्हाळी भातपीक जमीनदोस्त झाले आहे. यामुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
राज्यात एकीकडे उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाकडून अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत असल्याने शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील वादळी वारा व गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. साधारण आठवडाभरापासून अवकाळी पाऊस होत आहे. यामुळे शेतक-यांना याचा फटका बसत आहे.
उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता
जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील आठ दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी बरसत आहे. मोहाडी, लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील आसगाव परिसरातील शेतीला याचा सर्वाधिक फटका बसल्याचे चित्र बघायला मिळतं आहे. सध्या उन्हाळी भात पीक कापणीला आलेला असून वादळीवा-यामुळं भात पीक अक्षरश: आडवा झाला आहे.
तात्काळ पंचनाम्याची मागणी
वादळी वारा आणि गारपीटमुळं भात पिकाची लोंबी गळाली असून शेत शिवारामध्ये पाणी साचले आहे. यामुळे भात पिकाचे उत्पादन घटणार आहे. बागायती शेतक-यांनाही या अवकाळीचा फटका बसला असून शेतकरी आर्थिक विवंचनेत अडकला आहे. महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतक-यांच्या शेत बांधावर जाऊन तातडीनं नुकसानीचे पंचनामे करावे आणि राज्य सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता शेतक-यांनी केली आहे.