गंगाखेड : भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ त्वरित स्थापन करावे अशी मागणी दि. ४ डिसेंबर रोजी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समितीच्या वतीने नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
उद्योग, व्यवसाय, नौकरी व रोजगार निर्मितीची साधने नसल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश ब्राम्हण समाज बांधवांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुद्धा कठीण झाले आहे. ब्राम्हण समाजातील तरुणांना व्यवसाय उभारणी करून रोजगार निर्माण करता यावा तसेच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे या करिता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ब्राह्मण समाज बांधवांच्या वतीने राज्य भरात धरणे आंदोलन करण्यात आले.
त्याचप्रमाणे मुंबई येथील आझाद मैदानावर ६ दिवस उपोषण करत दि. १० ऑक्टोबर रोजी ब्राम्हण समाजातील सर्वच संघटनांनी एकत्रित येऊन विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला व दि. २८ नोव्हेंबर पासून जालना येथे अमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणास पाठींबा दर्शवत आम्हाला आरक्षण नको महामंडळ द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर अखिल भारतीय ब्राह्मण समाज संघटनेचे प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर), श्रीधरचार्य जोशी, चंद्रकांत खारकर, डॉ. समीर गळाकाटू, देवानंद जोशी, राम कासांडे, श्रीमती पद्मजाताई कुलकर्णी, सौ. अर्चना जोशी, रुपाली जोशी, सविता राखे, शाम कुलकर्णी, नागेश केरकर, धोंडोपंत राजेंद्र, मयूर कुलकर्णी, रंगराव सुपेकर, नागेश कोनार्डे, सुनील कोनार्डे, विनायक महाजन, उमेश सराफ, अॅड. राजू देशमुख आदींसह भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ संघर्ष समिती सदस्यांच्या स्वाक्ष-या आहेत.