22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeनांदेडभनगी, वाहेगाव शिवारातील अड्डे उद्ध्वस्त

भनगी, वाहेगाव शिवारातील अड्डे उद्ध्वस्त

नांदेड : प्रतिनिधी
गोदावरी नदीतील अवैधरित्या रेती तस्करी करणा-या माफीयांविरोधात महसूल विभाग व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सायंकाळी सुरू केलेली कारवाई मंगळवारी दिवसभर सुरूच होती. या कारवाई जप्त करण्यात आलेले रेती उपसा करणारे इंजिन, तराफे यासह भनगी, वाहेगाव शिवारातील बिहारींचे ३० अड्डे उद्धस्त करण्यात आले. पथकाने आता बिहारी टोळ्यांची धरपकड सुरू केली आहे.

मागील काही दिवसांपासून रेती माफियांनी गोदावरी नदी पात्रात धुमाकुळ घातला आहे. दररोज हजारो ब्रास रेतीचा अवैध उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. यामुळे नदीसह विष्णुपुरी प्रकल्पास धोका निर्माण झाला आहे. अखेर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रेती तस्करीची गंभीर दखल घेतली. यामुळे नांदेड तालुक्यातील भनगी आणि वाहेगाव येथे अवैधरित्या रेती उपसा करणा-या माफियांविरुद्ध सोमवारी सायंकाळी संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, नांदेडचे उपविभागीय अधिकारी विकास माने आणि तहसीलदार संजय वरकड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयलाने यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली कारवाई सोमवारी रात्री आणि मंगळवारी दिवसभर सुरूच होती. तलाठी, मंडळ अधिकारी, पोलिसांचे क्युआरटी पथकही या कारवाईत सहभागी झाले आहेत. मोठ्या फौजफाट्यासह सुरू असलेल्या कारवाई जप्त करण्यात आलेले रेती उपसा करणारे १० इंजिन पंप, ४० तराफे जिलेटिनच्या सहायाने नष्ट करण्यात आले. तर भगनी व वाहेगाव शिवारात तयार करण्यात आलेले ३० अड्डेही उद्धस्त करण्यात आले. तर महसूल, पोलिस पथकाकडून आता गोदावरी नदी पात्रातून रेती उपसा करणा-या बिहारी टोळींचा शोध घेत धरपकड करण्यात येत आहे. काही बिहारी मजूर पोलिसांनी रात्रीच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. या कारवाई दोन हायवा ट्रकही पकडण्यात आले असून या हायवा नांदेड तहसील कार्यालयात तर जप्त करण्यात आलेला जवळपास १५० ब्रास वाळूचा साठा शासकीय वाळू डेपो खूपसरवाडी येथे जमा करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांनंतर सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून अनेक जण भूमिगत झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR