अहिल्यानगर : प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील जांबवडी रस्त्यावर भीषण अपघात घडला. या अपघातात बोलेरो कार रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडली. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पन्नास फूट खोल विहिरीत पडली. आवाज ऐकून जमलेल्या ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
बोलेरो कार जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गाडी गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो कार रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली. अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०) व चक्रपाणी सुनील बारस्कर (२५ सर्व रा. जांबवाडी, ता. जामखेड) यांचा या अपघातात मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तात्काळ घटनास्थळी आपली रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी दिली.