वंचितची पाचवी यादी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई, उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य यासह धाराशिव, रायगड, नंदूरबार, जळगाव, दिंडोरी, पालघर, भिवंडी या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. धाराशिवमधून शिवसेना शिंदे गटाचे इच्छुक नेते भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे.
भाऊसाहेब आंधळकर हे बार्शीचे नेते असून, त्यांनी धाराशिवमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा सोडण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली होती. तसेच राष्ट्रवादीकडील जागा शिंदे गटाकडे घेऊन उमेदवारी देण्याची मागणी केली होती. आता ते वंचितमधून मैदानात उतरल्याने तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे आहेत.
मुंबई उत्तरमधून बीन राजकुमार सिंग, मुंबई उत्तर-पश्चिममधून संजीवकुमार आप्पाराव कलकोरी, मुंबई दक्षिण-मध्यमधून अब्दुल हसन खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यासोबतच रायगडमधून कुमुदिनी चव्हाण, धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर, नंदूरबार मधून हनुमंतकुमार सूर्यवंशी, दिंडोरीतून गुलाब मोहन बरडे, पालघरमधून विजया म्हात्रे, भिवंडीतून निलेश सांबरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.