नांदेड : प्रतिनिधी
भाजपकडून सातत्याने घराणेशाहीवर आरोप केला जातो. घराणेशाहीवरूनच भाजपने अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे. प्रादेशिक पक्षांवरही हल्लाबोल केला आहे. मात्र, आता भाजपला उमेदवारच मिळत नसल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेमध्ये घडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुरेपूर कार्यकर्त्यांना बळ देणा-या असतात असे सातत्याने समजलं जातं किंवा तशी एक धारणा बनली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये निवडणुका न झाल्याने पक्षासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्तेच सैरभैर झाले होते. मात्र, आता निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने गावगाड्यांसह छोट्या-मोठ्या शहरांमध्ये सुद्धा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे निवडणुकीची धांदल सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये खरोखरच कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे का? हा सवाल आहे. नांदेडमध्ये चक्क एकाच कुटुंबात सहा जणांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे.
भाजपने या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असले तरी एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली आहे. ज्यात नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तसेच पत्नी गोदावरी गजानन सूर्यवंशी यांना (प्रभाग ७ अ) मधून, भाऊ सचिन सुभाषराव सूर्यवंशी यांना (प्रभाग क्रमांक १ अ) मधून, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी (प्रभाग ८ अ) मधून, मेहुणा युवराज वसंतराव वाघमारे (प्रभाग क्रमांक ७ ब) मधून, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना (प्रभाग क्रमांक ३) मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या अनोख्या राजकीय कुटुंबाची चांगलीच चर्चा रंगली आहे. एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देण्यात आल्याने लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सडकून प्रहार केला आहे. लोहामध्ये भाजपला उमेदवारच भेटत नाहीत म्हणून एकाच घरातील लोकांना उमेदवारी द्यावी लागत आहे. पक्षाने याची दखल घ्यावी, असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे.
लोहा नगर परिषदेत तिरंगी लढत
दुसरीकडे, नांदेड जिल्ह्याचे लक्ष लोहा नगर परिषदेकडे लागले असून भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोहा हा बालेकिल्ला मानला जातो. आतापर्यंतच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व राहिले आहे. लोहा नगर परिषदेत एकूण दहा प्रभाग असून २० नगरसेवकांसाठी ही निवडणूक होत आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढत आहे. चव्हाण हे भाजपावासी झाल्यापासून जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. लोहा नगर परिषदेसाठी इच्छुकांची संख्या देखील अधिक होती, असे असताना भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे भाजपकडून काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. त्यातच आता एकाच कुटुंबातील सहा जणांना तिकिट दिल्याने हा घराणेशाहीचा प्रकार नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

