पुणे : प्रतिनिधी
प्रदेश भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून पक्षाने त्याचे स्वरूप अंमलबजावणी आराखडा करण्याचे निश्चित केले आहे. आराखड्यासाठी विविध घटकांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या अपेक्षा सूचनांच्या स्वरूपात पक्षाकडे पाठवाव्यात, असे आवाहन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत केले. दिवाळीनंतर जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारांनी केंद्रात आणि राज्यात अंमलबजावणीच्या आघाडीवर उल्लेखनीय यश मिळविले आहे, असे नमूद करून ते म्हणाले, परंपरागत जाहीरनाम्यात केवळ आश्वासने असतात. संकल्पपत्र ही पुढची पायरी होती.
सत्तेवर पुन्हा येण्याच्या आत्मविश्वासातून संकल्पातून कशा प्रकारे सूचना अमलात आणायच्या याचा आराखडा तयार करीत आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी ३० सदस्यांची एक जाहीरनामा समिती सुधीर मुनगंटीवार यांनी तयार केली आहे. सूचना पाठविण्यासाठी पक्षाने वेबसाईटवर स्वतंत्र विभाग तयार केला आहे. मतदारांनी इ – मेल अथवा पत्र पाठवून आपल्या ठोस सूचना पाठवाव्यात असे आवाहन केले आहे.
मुख्य समितीच्या अंतर्गत विविध विषयांसाठी एकूण १८ उप समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले.