मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्च २०२५ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती सरकारमध्ये यापैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने या जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली असून, दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
पण त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावान नेते माधव भंडारी यांची संधी पुन्हा हुकली आहे. भाजपकडून दिल्लीला पाठवलेल्या प्राथमिक यादीत माधव भंडारी आणि अमरनाथ राजूरकर यांच्या नावांचा समावेश असल्याची चर्चा होती. मात्र, अंतिम यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. भाजपच्या या निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर नवे उमेदवार निवडल्याने काही नवीन समीकरणे तयार होऊ शकतात.
भाजप आणि संघ परिवारात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्यरत असलेले माधव भंडारी यांना यंदाही विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता आहे. २०१४ पासून भाजप सत्तेत आल्यानंतरही त्यांना महत्त्वाचे पद मिळाले नाही, आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळी त्यांचे नाव चर्चेत असते, मात्र प्रत्यक्षात उमेदवारी मिळत नाही.
यंदाही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याने भाजप आणि संघ परिवारातील जुन्या-जाणत्यांच्या वर्तुळात याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांपैकी ३ जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून, उर्वरित २ जागांपैकी १ शिवसेनेकडे आणि १ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस उद्या (१८ मार्च) असून, त्यापूर्वीच भाजपने दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांच्या नावांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजी आणि जुन्या निष्ठावान नेत्यांना डावलण्याच्या धोरणावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.