मुंबई : प्रतिनिधी
नेहमीप्रमाणे भाजपा फोडाफोडीचे राजकारण करत आहे. दुस-यांची घरे, पक्ष फोडल्याशिवाय भाजपला चैन पडत नाही. त्यांना यामध्ये आसुरी आनंद मिळतो. या आसुरी आनंदापोटी काही गडबड करण्याचा प्रयत्न ते करू शकतात, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्राचे राजकारण चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभेत एकीकडे महायुतीने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार झाला नसताना दिल्लीमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यावरून दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जोर वाढला आहे, त्यावरून ‘कुछ तो गडबड है’ असेच वाटत आहे,’’ असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये अदानी यांच्या घरी भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. यावर ते म्हणाले की, त्यांच्या बैठका कशासाठी झाल्या? हे मला माहिती नाही. पण शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे. गौतम अदानी यांच्याबाबतीत वारंवार शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज मला वाटत नाही.
अधिवेशनात काहीच निष्पन्न होणार नाही
‘या अधिवेशनात फार काही निष्पन्न होईल, असे वाटत नाही. फुकट कशाला नागपूरला अधिवेशन घेतले? हाच प्रश्न आम्हाला पडतो. उगाच लोकांना त्रास द्यायला हे ४ -५ दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. ना प्रश्नोत्तरे ना लक्षवेधी काहीच नाही. बिलावर चर्चा, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे.