मुंबई : वृत्तसंस्था
भाजपाचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाकडून केंद्रीकरणाकडे उलटा प्रवास सुरू आहे. भाजपाच्या सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खोळंबल्या आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उल्हासनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले होते. पण भाजपाला विशेषत: नरेंद्र मोदींना केंद्रात तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांना सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि या हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
मोदी सरकारच्या १० वर्षांच्या काळात लघू, छोटे व मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले आहेत. नोटबंदी व जीएसटी नंतर या व्यवसायाला अवकळा आली. नोटबंदीमुळे काळा पैसा उघड झाला नाही तर जेवढ्या नोटा होत्या तेवढढ्या आरबीआय मध्ये जमा झाल्या आहेत. पण नोटबंदीमुळे मध्यम व्यवसाय मोडीत निघाला. लोकशाहीमध्ये समता आणि सामाजिक न्यायाची मुल्ये आहेत. मोदी सरकारमध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरिब अधिक गरिब होत आहेत, गरिब व उपेक्षितांचा विचार झाला पाहिजे, छोट्या लघु उद्योगाला चालना मिळाली पाहिजे असेही सपकाळ यांनी सांगितले.