बीड : बीड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मतभेद बुधवारी माध्यमांसमोर पुन्हा एकदा आले. भाजप आमदार सुरेश धस आणि भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर टीका करत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करण्याची भाषा केली. पंकजा मुंडे यांनी मी राष्ट्रीय नेत्या असताना माझ्यावर सुरेश धस आरोप करतात, यामुळे आपण त्यांची तक्रार करणार असल्याचे म्हटले. त्याला उत्तर देताना सुरेश धस यांनी पक्षाचा उमेदवार सोडून दुस-याचा प्रचार राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे त्यांची लेखी तक्रार करणार असल्याचे सांगितले.
आमदार सुरेश धस म्हणाले, संतोष देशमुख हे भाजपचे बुथ प्रमुख होते. त्यामुळे हे प्रकरण मी तापवले आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेक-यांना शिक्षा होत नाही? तोपर्यंत हे प्रकरण तेवत ठेवणार आहे. पंकजाताई म्हणतात, मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, आम्ही भाजपचे आहोत ना. विधानसभेत त्यांची एकच जागा होती, असे त्या जाहीरपणे म्हणत होत्या. पंकजाताईंचे आष्टी मतदारसंघात ‘कमळ’ चिन्ह नव्हते, त्यांचे ‘शिट्टी’ हे चिन्ह होते. आमच्याकडे पंकजा मुंडे यांच्या विचारांचा माणूस आष्टीमधून निवडून आला नाही, मी भाजपचा व्यक्ती म्हणून निवडून आलो आहे. हे त्यांचे दु:ख आहे. भाजप उमेदवाराऐवजी दुस-या उमेदवाराचा प्रचार केल्यामुळे मी पंकजा मुंडे यांची तक्रार राष्ट्रीय नेतृत्वाकडे लेखी स्वरूपात करणार आहे, असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
मला समज देण्याचे कारण काय? मी पक्षाचा उमेदवार सोडून दुस-याचा प्रचार केला नाही. त्यांनी आष्टीत कमळाचा प्रचार सोडून शिट्टीचा प्रचार केला. त्या बीडमध्ये माझी एकच जागा आहे, असे म्हणत होत्या. तो व्हीडीओ तुमच्याकडे आहे, असे धस यांनी सांगितले.
कॅमेरे माझ्या मागे येतात
सुरेश धस सर्वत्र कॅमेरे घेऊन जातात, मग धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या वेळी कॅमेरे का नेले नाहीत? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला होता. त्याला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, मी कॅमेरे घेऊन जात नाही. कॅमेरे माझ्या मागे येतात. धनंजय मुंडे दवाखान्यात असल्यामुळे मी त्यांना भेटण्यास गेलो, हे खरे आहे.
संतोष देशमुख प्रकरणात मौन का होत्या?
पंकजा मुंडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना भेटण्यास गेल्या नाहीत. त्या विषयावर काहीच त्या बोलल्या नाहीत. धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले तेव्हा पंकजा मुंडे बोलल्या नाहीत. पद गेल्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास उशीर झाला, असे म्हटले. आम्ही मात्र आधीपासून बोलत होतो. त्यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी करत होते. गुन्हेगारी आमच्याकडे नाही. राख परळी, वाळू परळी, सर्व गुन्हे परळीत आहेत, असे धस यांनी म्हटले.