नितीशकुमार यांचे खातेवाटप, २० वर्षांत प्रथमच सोडले गृहमंत्रिपद
पाटणा : वृत्तसंस्था
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी आज खातेवाटप जाहीर केले. नितीश कुमार यांच्यासोबत २६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. गेल्या २० वर्षांपासून नितीशकुमार यांनी गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवले होते. यावेळी नितीशकुमार यांनी गृहमंत्रिपद भाजपच्या सम्राट चौधरींना दिले. विशेष म्हणजे यावेळी बिहार सरकारमधील महत्त्वाची खाती भाजपच्या नेत्यांना देण्यात आली.
नितीशकुमार यांनी गृह मंत्रालय भाजपच्या सम्राट चौधरींकडे दिले तर महसूल खात्यावरही भाजपचे वर्चस्व पाहायला मिळाले. विजयकुमार सिन्हा यांना महसूल मंत्रिपद देण्यात आले. आरोग्य, कायदा, कृषी, उद्योग, सहकार, मागासवर्गीय कल्याण, अनुसूचित जाती जमाती, नगरविकास भाजपकडे देण्यात आली आहेत. लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाकडे ऊस उद्योगासह सार्वजनिक आरोग्य नियंत्रण विभाग तर जीतनराम मांझी यांच्या हम पार्टीकडे सूक्ष्म जलसंधारण खाते देण्यात आले आहे. उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाला पंचायतराज विभाग सोपवण्यात आला.
उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांच्याकडे महसूल आणि खनिकर्म मंत्रालय, भाजपच्या मंगल पांडे यांना आरोग्य आणि विधी व न्याय खाते, दिलीप जयस्वाल यांना उद्योग खाते देण्यात आले. नितीन नवीन यांना नगर विकास आणि रस्ते विकास खाते देण्यात आले. रामकृपाल यादव यांना कृषी खाते देण्यात आले आहे. संजय टायगर यांना श्रम संसाधन खाते देण्यात आले आहे.

