मुरुड : वार्ताहर
भारतीय जनता पार्टीचे लातूर ग्रामीणमधील महामंत्री तथा मुरूड ग्रामपंचायतचे सदस्य अनंत कणसे यांनी आपले सहकारी रामकृष्ण कर्ण पुदाले, विनोद पुदाले, सुभान सय्यद, रंजित धाकतोडे, ईशाद तांबोळी, चंद्रकांत निचळे, अमोल पिंपरे, महाविर टिळक व शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ मुरूड येथे आयोजित सभेत, लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
यावेळी अनंत कणसे म्हणाले की, मागील बावीस वर्षांपासून मी भाजपमध्ये निष्ठेने काम करीत आलो आहे मात्र पक्षात कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नव्हती. मेहनत करणा-या कार्यकर्त्यांची कदर न करता, त्यांना डावलले जात होते. विकासाचे राजकारण करण्याऐवजी लातूर ग्रामीणचे आमदार व देशमुख कुटुंबाविरोधात द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे धिरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिले जाणारे प्रोत्साहन हे प्रमुख कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, युवक आणि महिलांसाठी ठोस काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी धिरज विलासराव देशमुख यांनी अनंत कणसे व त्यांच्या सर्व सहका-यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे लातूर ग्रामीण तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला याचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सभेदरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

