मुंबई : प्रतिनिधी
लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसांवर येऊन ठेपले, तरी महायुतीचे जागावाटप अद्याप रखडले आहे. उमेदवार बदलासाठी भाजप दवाबतंत्राचा अवलंब करत आहे. पण, एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार, खासदारांमुळे भाजप सत्तेची फळं चाखतंय, अशा शब्दांत सुरेश नवले यांनी सुनावले आहे. ते प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते.
दरम्यान, ठाणे, कल्याण, धाराशिव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग यासह शिंदे गटाच्या काही जागांवर भाजपने दावा सांगितला आहे. तसेच, काही ठिकाणी उमेदवार बदलासाठी शिंदे गटाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता असून शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. यावरून माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
उमेदवारांबाबत नकारात्मक अहवाल
सुरेश नवले म्हणाले, एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या खासदारांना तिकिट मिळावे ही अपेक्षा आहे. खासदारांना तिकिट देण्याची तीव्र इच्छा मुख्यमंत्र्यांची आहे. पण, भाजप दवाबतंत्राचा अवलंब करून उमेदवार पात्र नसल्याचे सांगत आहे. आयबीच्या सर्व्हेचा अहवाल खासदारांबाबत नकारात्मक असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.
भाजप सत्तेची फळं चाखतोय
एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या आमदार, खासदारांमुळे भाजप सत्तेची फळं चाखतोय. हाच भाजप एकनाथ शिंदेंबरोबर आलेल्या आमदार आणि खासदारांना बाजूला करत आहे, असा आरोप नवलेंनी भाजपवर केला.