27.4 C
Latur
Monday, April 14, 2025
Homeसंपादकीयभाजप म्हणजे कटकारस्थान!

भाजप म्हणजे कटकारस्थान!

अहमदाबादमध्ये काँगे्रसचे ८४ वे अधिवेशन बुधवारी पार पडले. या दोन दिवसीय अधिवेशनात वैचारिक देवाण-घेवाण झाली. काँगे्रस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. आम्ही जाती आधारित जनगणना करण्याची मागणी केली पण पंतप्रधान मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर जाती आधारित जनगणनेचा कायदा मंजूर करू असे राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपने कटकारस्थान रचून जिंकल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. येणा-या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मला फक्त माझ्या कामात रस आहे, लोक काय म्हणतील याने मला काहीही फरक पडत नाही. तेलंगणात आम्ही क्रांतिकारी निर्णय घेतला.

तेथे आम्ही जातनिहाय जनगणना करीत आहोत. काही महिन्यांपूर्वी मी संसदेत एक भाषण केले होते. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मी मोदींकडे मागणी केली होती. या देशात दलित किती आहेत, मागास किती आहेत, मुस्लिम-आदिवासी किती आहेत हे समजले पाहिजे असे मी म्हणालो होतो. देशाचा ‘एक्स-रे’ काढला पाहिजे, अशी मागणी मी केली होती. पण मोदीजी, संघाने आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. काँगे्रसच्या या अधिवेशनाला देशभरातून १७००हून अधिक काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते. काँग्रेस प्रतिनिधींना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, देश आता भाजपला कंटाळला आहे. बिहारच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर येईल. भाजपने महाराष्ट्रात निवडणूक कशी जिंकली ते तेथील लोकांना विचारा. महाराष्ट्रात ५० लाख मतदार अचानक कसे वाढू शकतात? महाराष्ट्रातील मतदारयाद्या आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला मागितल्या होत्या पण त्या अजूनही मिळालेल्या नाहीत. ठोस विचार नसलेला राजकीय पक्ष संघासमोर उभा राहून वैचारिक लढा देऊ शकत नाही.

काँग्रेसकडे वैचारिक स्पष्टता आहे. संघाविरोधात फक्त काँगे्रस लढा देऊ शकतो. संविधानाच्या रक्षणासाठी संघ व भाजपविरोधात लढाई कायम राहील आणि हे काम काँग्रेसलाच करावे लागेल, त्यामुळे कार्यकर्त्यांनी या लढाईसाठी तयार राहिले पाहिजे असा सल्ला राहुल गांधी यांनी दिला. अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संघ व भाजपविरोधात लढण्यासाठी विचार, आचार आणि प्रचाराची गरज आहे. काँगे्रसकडे विचार आणि आचार असून आता प्रचारावर जोर दिला पाहिजे. शिवाय पक्षाकडे मनुष्यबळ, मानसिक बळ व आर्थिक बळ असावे लागते. काँग्रेसकडे आर्थिक बळ कमी असले तरी मनुष्यबळ व मानसिक बळ आहे. त्यामुळे काँगे्रस संघ व भाजपविरोधात लढू शकतो असा विश्वास खरगे यांनी व्यक्त केला. संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा स्पष्ट करताना राहुल गांधी यांनी वक्फ कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला. नव्या वक्फ कायद्यामुळे धर्माच्या स्वातंत्र्यावर व संविधानावर हल्ला झाला आहे.

मुस्लिमानंतर ख्रिश्चनांच्या जमिनी काढून घेतल्या जातील असे संघ विचाराच्या नियतकालिकात म्हटले होते. शीख व इतर अल्पसंख्याकांच्या जमिनीही बळकावल्या जातील असा इशारा राहुल गांधींनी दिला. खरगे यांनीही वक्फच्या मुद्यावर काँग्रेसच्या पाठीशी असल्याचे सांगितले. केरळचे खासदार शशी थरूर यांनी फक्त भाजपचे टीकाकार होऊन चालणार नाही. त्याचा काँग्रेसला फायदा मिळण्याची शक्यता नाही. उलट सकारात्मक विचार करूनच पुढे गेले पाहिजे असा विचार मांडला. लोकसभेच्या सलग तीन निवडणुकांमध्ये आपण पराभूत झालो आहोत. आपल्याला मतांची टक्केवारी वाढवता आली नाही यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. राष्ट्रवादाचा मुद्दा आपण हिरिरीने मांडला पाहिजे असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या ठरावामध्ये राष्ट्रवादाच्या मुद्याचा समावेश करण्यात आला आहे. जातींमध्ये व धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा संघाचा राष्ट्रवाद मान्य नसून सर्वांना एकत्र घेऊन जाणारा राष्ट्रवाद काँग्रेसला अभिप्रेत असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रवादाचा अर्थ प्रादेशिक अखंडता तर असतोच. यासोबत सामाजिक, राजकीय व आर्थिक सशक्तीकरणाचा देखील त्यामध्ये समावेश होतो. सर्व देशवासीयांना समान न्याय देणे, वंचित-पीडित-शोषितांच्या अधिकारांचे रक्षण करणे, सद्भावना व बंधुभावाच्या सूत्राने देश एकसंध ठेवणे आणि भारताचा बहुलतावादी व उदारमतवादी आचार, विचार व व्यवहार म्हणजे राष्ट्रवाद. काँग्रेसचा राष्ट्रवाद समाजाला जोडणारा आहे तर भाजपचा, संघाचा ढोंगी राष्ट्रवाद समाजाला तोडणारा, सत्तेसाठीचा संधिसाधू आहे. सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी भाजप व संघ देशात धर्म, जात, भाषा, प्रांत, खाद्यसंस्कृती याच्या आधारावर दुही माजवत आहे असे ठरावात नमूद करण्यात आले आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत. जे पक्षाचे काम करत नाहीत,

पक्षाची जबाबदारी घेत नाहीत अशांनी निवृत्त व्हावे. त्यांना आराम करण्याची गरज आहे, असे पक्षाध्यक्ष खरगे यांनी नेते व कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले. त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस बळकट केल्या जातील आणि जिल्हाध्यक्षांना व्यापक अधिकार दिले जातील. उमेदवार निवडीमध्ये त्यांचा सहभाग असेल असे खरगे यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमवरून सरकारवर निशाणा साधताना खरगे म्हणाले, भाजपने असे तंत्रज्ञान बनवले आहे की ज्याचा त्यांना फायदा होईल आणि विरोधकांचे नुकसान होईल. आज आमचा पराभव होत असला तरी उद्या या देशाचे तरुण नक्की याविरोधात लढा देतील. देश सध्या एकाधिकारशाहीकडे जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची संपत्ती हे सरकार आपल्या श्रीमंत मित्रांकडे हस्तांतरित करीत आहे. एकंदरीत प्रकार पाहता पंतप्रधान मोदी एक दिवस आपला देश विकून टाकतील. ते काही असो, काँग्रेसमध्ये आता विचारमंथन सुरू झाले हेही नसे थोडके!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR