27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयभाजप सत्तेत असताना अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर अधिक हल्ले

भाजप सत्तेत असताना अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर अधिक हल्ले

राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली : बीफ नेत असल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ नागरिकाला पाच-सहा तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना धुळे-मुंबई एक्स्प्रेसमध्ये घडली. तसेच हरियाणा येथील चरखी-दादरी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एक्सवर एक पोस्ट करत काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच भाजपा सत्तेत असताना अल्पसंख्याक आणि मुस्लिमांवर अधिक हल्ले होत आहेत, असा मोठा आरोपही केला आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी म्हणतात की, द्वेषाचा राजकीय शस्त्र म्हणून वापर करून सत्तेच्या शिडीवर चढलेले लोक देशभरात सतत भीतीचे वातावरण प्रस्थापित करत आहेत. जमावाच्या रूपात लपलेले द्वेषी घटक कायद्याला आव्हान देत जाहीरपणे हिंसाचार पसरवत आहेत. या उपद्रवी घटकांना भाजपा सरकारकडून मोकळे रान देण्यात आले आहे. त्यामुळेच त्यांनी हे असे धाडस दाखवले आहे. अल्पसंख्याकावर विशेषत: मुस्लिमांवर सातत्याने हल्ले होत असून सरकारी यंत्रणा मूकपणे या सगळ्या गोष्टी केवळ पाहत आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पुढे आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, अराजक पसरवणा-या बेशिस्त घटकांवर कडक कारवाई करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. भारताच्या सांप्रदायिक एकतेवर आणि भारतीय लोकांच्या हक्कांवर कोणताही हल्ला हा संविधानावरील हल्ला आहे, जो आम्ही अजिबात सहन करणार नाही. भाजपाने कितीही प्रयत्न केले तरी द्वेषाच्या विरोधात भारताची एकजूट करण्याची ही ऐतिहासिक लढाई आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR