लातूर : प्रतिनिधी
मागील दहा ते पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारपेठेत हिरव्या मिरचीने शंभरी गाठली होती. परंतु, गेल्या आठ दिवसापासून बाजार समितीत मिरचीची एकदम आवक वाढल्याने मिरचीचा ठसका उतरला असल्याचे दिसून आले. एकंदरीत भाजीपाल्याच्या दरात ४० टक्क्यांची घसरण झाल्यामुळे भाजीपाला स्वस्त झाला आहे. मात्र टोमॅटो असूनही भाव खात आहे.
पावसामुळे बाजारात भाजीपाल्याची काही प्रमाणात आवक कमि झाली असली तरी मागील आठवड्यापासून हिरव्या मिरचीची आवक मात्र वाढली आहे. सध्या महात्मा फुले बाजार समितीत चागंल्या प्रकारची हिरवी मिरची येत असली तरी मिरचीच्या दरात घसरण झाली आहे. बाजारपेठेत जुन महिन्यात मिरचीचे दर ८० रूपये प्रतिकिलो पर्यंत वाढले होते. मात्र गेल्या आठ दिवसापासून मिरचीच्या दरात ४० टक्क्यांची घसरण होवून किरकोळ बाजारत ३० ते ४० रूपयांच्या घरात आली आहे. पुढील काही दिवस तरी हे दर वाढणार नसल्याचे व्यापारी मिनाझ बागवान यांनी सागीतले आहे. शहरातील बाजारपेठेत ग्रामिण भागासह शेजारील जिल्यातून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. गेल्या काही दिवसापासून इतरही भाजीपाल्यांच्या दरात तेजी पाहावयास मिळाली होती. सध्या सर्वच भाज्यांची आवक वाढत असल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर कमि होत आहेत. सध्या बाजारपेठेत भाजीपाल्यांचे दर कमी असल्याने सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सध्या किरकोळ बाजारात कोथंबीरची ४० रुपयांना जुडी येत आहेत.
त्यासोबतच वांगे, मिरची तसेच बटाटे, शिमला मिरची यांचे भाव ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दरम्यान आहेत. टमॉटो ६० रुपयेकिलो मिळत आहेत. तर कारला, दोडके, सिमला मिरची आदींची भावे ५० ते ६० रुपये प्रतिकिलोच्या दरात आहे. फुल कोबी, पत्ता कोबी, गाजर, पालक, मेथी आदींचेभाज्यांचे दरही आटोक्यात आले आहेत. यामुळे महागाईच्या झळा सोसणा-या सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कमी पाण्यावर पिके फुलवूनही दरात घसरण झाल्याने उत्पादक शेतकरी निराश झाला आहे. आवक व मागणीनुसार भाज्यांचे दर ठरत असतात. सध्या बाजारात सर्वच प्रकारच्या भाज्यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे.