गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या छत्तीसगड राज्यात मुसळधार पाऊस पडल्याने भामरागडनजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आला असून, पुराचे पाणी भामरागड गावात शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे त्या भागातील १०० गावांचा संपर्क तुटला आहे.
भामरागड तालुक्याची सीमा ओलांडताच छत्तीसगड राज्याची सीमा प्रारंभ होते. तेथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने इंद्रावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. परिणामी पर्लकोटा नदीला पूर आला असून, जुन्या पुलावरुन पुराचे पाणी वाहू लागल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. छत्तीसगडमधील पाऊस लक्षात घेता संभाव्य स्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या सुचनेनुसार मंगळवारी रात्री ११ वाजता सिरोंचा येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक भामरागड येथे पाठविण्यात आले.