मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल (दि.२६) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जागतिक पातळीवर अर्थतज्ज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले डॉ. मनमोहन सिंग हे ९२ वर्षांचे होते. देशाचे पहिले शीख पंतप्रधान म्हणून काम केलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राज्यातील नेत्यांनी देखील डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. पटोले यांनी लिहिले आहे की, देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करून पटोले म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंह साहेबांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि राजकीय कारकीर्दीत भारताच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घातला. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी देशात आर्थिक उदारीकरणाच्या मार्गाने अर्थव्यवस्थेला चालना दिली. २००४ साली देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आली. सोनिया गांधी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी देशाला जागतिक पटलावर एक आर्थिक सत्ता म्हणून भारताला मान्यता मिळवून दिली.
आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात माहितीचा अधिकार, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा, मनरेगा असे कायदे करून त्यांनी सर्वसामान्यांच्या अधिका-यांना कायद्याचे रूप देत संविधानाने दिलेले अधिकार शेवटच्या रांगेतील लोकांना मिळतील याची काळजी घेतली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वच क्षेत्रांत मोठी प्रगती केली.
त्यांचा दहा वर्षांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ देशाच्या इतिहासातील प्रगतीचा सुवर्णकाळ म्हणून लक्षात राहील. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे व देशाचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.