मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे महिला विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य हे केवळ कायदेशीर सुधारणा नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, असे मत सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांना दिलेले अधिकार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे नुकतेच करण्यात आले होते.
या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या. चर्चासत्रात माजी आमदार भाई गिरकर, माजी खासदार मनोज कोटक, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, अॅड. माधवी नाईक, डॉ. मेधा सोमय्या आणि रश्मी जाधव उपस्थित होते.