३-० ने जिंकली एकदिवसीय मालिका
अहमदाबाद : भारताने इंग्लंडला तिस-या वनडे मालिकेत १४२ धावांनी पराभूत करत दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने वनडे मालिकेत इंग्लंडवर निर्भेळ मालिका विजय नोंदवला. शुबमन गिलचे शतक, विराट कोहलीचे कमबॅक अर्धशतक, श्रेयस अय्यरची वादळी खेळी आणि गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने तिस-या वनडे सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी हा मालिका विजय खूप महत्त्वाचा ठरला आहे.
शुभमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ३५६ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने दमदार सलामी दिली. पण त्यानंतर अर्शदीप सिंग आणि अन्य गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने भेदक मारा करीत इंग्लंडला २१४ धावांत रोखले आणि १४२ धावांनी मोठा विजय साकारला. भारताने यापूर्वी दोन्ही सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे हा तिसरा सामना जिंकत भारताने मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले.
गिलने इतिहास घडविला
इंग्लंडविरुद्धच्या तिस-या सामन्यात युवा सलामीवीर शुबमन गिलने शतक झळकावत इतिहास घडवला. १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारासह ११२ धावा करून तो बाद झाला. या शतकासह गिल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एकाच स्टेडियममध्ये शतक झळकावणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० आणि कसोटीत शतके झळकावल्यानंतर आज त्याने एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्याचा महान पराक्रम केला. गिलने वनडे क्रिकेट कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले.