सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द, पाकला साथ देणे भोवले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना भारत सरकारने तुर्कीला मोठा दणका दिला आहे. तुर्कीला पाकिस्तानला साथ देणे भोवले असून, याच कारणावरून भारताने देशातील प्रमुख विमानतळांवर ग्राऊंड हँडलिंग सेवा देणारी तुर्की कंपनी सेलेबीची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ब्युरो ऑफ एव्हिएशन सिक्युरिटीने म्हटले आहे. याबद्दलचा अधिकृत आदेश आज जारी करण्यात आला.
भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरही तुर्की सरकारने टीका केली होती. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानी सैन्याने भारताविरोधात कारवाया करताना तुर्कीच्या ड्रोन्सचाच वापर केला होता. यामुळे भारत आणि तुर्कीमधील संबंधात पुन्हा एकदा कटुता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानला जाहीर समर्थन देणा-या तुर्कीच्या कंपनीला आता भारताकडून झटका देण्यात आला.
नागरी विमान सुरक्षा ब्युरोने यासंदर्भात एक आदेश जारी केला असून, त्यानुसार सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला विमानतळांवर ग्राऊंड हँडलिंग सेवा देण्यासाठी दिलेली मंजुरी तात्काळ रद्द केली. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ग्राऊंड हँडलिंग एजन्सीच्या रुपात ही मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी आता रद्द करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या विमानतळांवर सेलेबीकडून सेवा दिल्या जात आहेत, तिथे पर्यायी ग्राऊंड हँडलिंग एजन्सींसोबत समन्वय ठेवून अंतरिम व्यवस्था केल्या जातील. लवकरच नव्या सेवा पुरवठादाराच्या नियुक्तीसाठी निविदा काढल्या जातील, असे सांगण्यात आले. सेलेबी एव्हिएशनला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी मुख्य विमानतळ अधिका-यांकडे केली होती. याची दखल घेण्यात आली आहे.
सेलेबी कंपनीची
९ विमानतळावर सेवा
सेलेबी एव्हिएशन देशातील ९ मोठ्या विमानतळांवर सेवा देते. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई यांच्यासारख्या संवेदनशील विमानतळांचा समावेश आहे. ग्राऊंड हँडलिंग, कार्गो सेवा आणि एअरसाईड ऑपरेशनसारख्या सुरक्षेशी संबंधित कामांची जबाबदारी सेलेबी एव्हिएशनकडे आहे. परंतु आता सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आल्याने या कंपनीला गाळा गुंडाळावा लागणार आहे.