चक दे इंडिया, पहिल्यांदा विश्वकप जिंकत रचला इतिहास
मुंबई : प्रतिनिधी
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आज रंगलेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करीत पहिली वहिली विश्वचषक स्पर्धा जिंकत इतिहास रचला. शफाली वर्मासह दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने २९९ धावांचा बचाव करीत फायनल बाजी मारली. अर्धशतकी खेळीनंतर दीप्ती शर्माने ५ विकेटचा डाव साधत संघाला ५२ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आणि वर्ल्ड कप जिंकला.
२००५ आणि २०१७ मध्ये अधुरे राहिलेले स्वप्न हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने नवी मुंबईत साकार करून दाखविले. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने शतकी खेळी केली. तिने भारतीय संघाचे टेन्शन वाढविले. परंतु दीप्तीच्या गोलंदाजीवर तिने मोठा फटका खेळला आणि अमनजोत कौरने कॅच पकडून तिस-या प्रयत्नांत ट्रॉफी जिंकण्याचा मार्ग मोकळा केला.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाशिवाय वर्ल्ड कपची फायनल रंगल्याचे पाहायला मिळाले. भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील फायनलसह २५ वर्षांनंतर नवा वर्ल्ड चॅम्पियन मिळणार, हे आधीच ठरले होते. अखेर तिस-या प्रयत्नांत भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपचे स्वप्न साकार केले.
भारतीय महिला संघाने टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत २९८ धावा करीत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हॉर्ट हिने सेमी फायनलनंतर फायनलमध्येही शतक करीत वर्ल्ड रेकॉर्ड रचला. वर्ल्ड कपच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिने आपल्या नावे केला. परंतु शेवटी भारतीय संघाने फायनल बाजी मारत अधुरे स्वप्न साकार झाले. दीप्ती शर्माने या सामन्यात तब्बल ५ विकेट घेतल्या आणि एक रनआउटही केला. तिच्या या अफलातून कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम २४६ धावांवरच गारद झाली. त्यामुळे भारताने ५२ धावांनी विश्वकप जिंकला.
भारताच्या विजयात दीप्ती शर्माने निर्णायक भूमिका बजावली. तिने अंतिम सामन्यात शानदार कामगिरी बजावत ५ बळी घेतल्या. त्यामुळे ५२ वर्षांच्या महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताने पहिल्यांदा किताब जिंकत महिला वर्ल्डकपमध्ये तिरंगा फडकवला. पहिला महिला वनडे वर्ल्ड कप १९७३ साली खेळवला गेला होता.
तीन लेकींनी सामना फिरविला
अमनजोत कौरने आधी ताजमिन ब्रिटसला रनआऊट केले. त्यानंतर त्याने महत्वाचा म्हणजे दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्व्हार्•चा कॅच घेतला तर शेफाली वर्माने ८७ धावा केल्या आणि २ विकेट घेतल्या. दीप्ती शर्माने ५८ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या ५ विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
शेफाली-स्मृतीची विक्रमी भागीदारी
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने दमदार सुरुवात केली. सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली. दोघींनी जबाबदारीने खेळ करत संघाला मजबूत पाया दिला. यात शेफालीने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. मानधनाने ४५ धावांची खेळी साकारली.
शेफालीची धमाकेदार खेळी
शानदार फलंदाजीनंतर शेफाली वर्मा गोलंदाजीत चमकली. तिने तिच्या दोन षटकांत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. शेफाली वर्माने आधी सून लुस आणि नंतर अनुभवी मॅरिझाने कॅपला बाद केले. त्याआधी शेफालीने लुस आणि वोल्वार्ड यांच्यातील अर्धशतकी भागीदारी मोडली होती. उत्कृष्ट कामगिरीसाठी तिला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला.

