महिला आशिया चषक, भारताची विजयी सलामी
कोलंबो : वृत्तसंस्था
महिला आशिया चषक स्पर्धेत हरमनप्रीतच्या भारतीय संघाने विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने पाकिस्तानचा ७ विकेटने दारुण पराभव केला. भारताकडून स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा यांनी चमकदार कामगिरी केली. भेदक मारा करणा-या दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पाकिस्तानचा पराभव करत भारतीय महिला संघाने आशिया चषकाची विजयी सुरुवात केली. टीम इंडियाचा पुढचा सामना रविवारी संयुक्त अरब अमिरातीसोबत होणार आहे.
आजपासून श्रीलंकेत महिला आशिया चषक स्पर्धेला सुरूवात झाली. भारतीय संघाने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सात विकेटने पराभव करत दणक्यात सुरुवात केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण दीप्ती शर्माच्या भेदक मा-यापुढे पाकिस्तानचा संघ फक्त १०८ धावांत गारद झाला. भारतीय संघाने हे आव्हान १४.१ षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी शानदार फलंदाजी केली. स्मृतीने ४५ तर दीप्तीने ४० धावांची खेळी केली.
स्मृती-शेफालीची
आक्रमक सुरुवात
पाकिस्तानने दिलेल्या १०९ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. सलामी फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांनी पाकिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. ९.३ षटकांत या दोघांनी ८५ धावांची सलामी दिली. स्मृती मंधानाने ३१ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यामध्ये ९ चौकारांचा समावेश होता तर शेफालीने २९ चेंडूत एक षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४० धावांचे महत्वाचे योगदान दिले. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या दोघांनी पहिल्या दहा षटकांमध्येच सामना भारताच्या बाजूने फिरवला. पाकिस्तानकडून सय्यदा अरुब शाहने सर्वाधिक दोन बळी घेतले.