दुबई : वृत्तसंस्था
डोक्यावरील कर्ज, विश्वासघाताचे प्रसंग आणि मानसिक ताण-तणावातून गेलेल्या वेणुगोपाल मुल्लचेरी यांनी दुबई विमानतळावर खरेदी केलेल्या लॉटरीच्या एका तिकिटाने त्यांचे आयुष्य बदलले आहे. १५ वर्षांपासून ते स्वत:चे नशीब आजमावत होते.
केरळच्या एका मध्यमवर्गीय कुटूंबातील ५२ वर्षीय वेणुगोपाल मुल्लचेरी यांनी दुबई ड्युटी फ्रीच्या ‘मिलेनियम मिलिअनेअर’ ड्रॉमध्ये तब्बल ६.५ कोटी रुपयांचा (१ मिलियन डॉलर) जॅकपॉट जिंकला आहे.
अजमान येथे राहणारे आणि आयटी सपोर्ट स्पेशालिस्ट म्हणून काम करणारे वेणुगोपाल मुल्लचेरी, गेल्या १५ वर्षांपासून या लकी ड्रॉमध्ये सहभागी होत होते. २३ एप्रिल रोजी भारतातील कुटुंबाची भेट घेऊन परतताना दुबई विमानतळावर त्यांनी हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्याला मोठे वळण मिळाले आहे.
वेणुगोपाल म्हणाले, ‘‘ही रक्कम जिंकणे म्हणजे एक जणू फार मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय. माझ्यासाठी एक कठीण पर्व संपून आता आशा आणि आनंदाने भरलेलं नवीन पर्व सुरू होत आहे. माझ्यावर खूप मोठं कर्ज होतं, कारण अलीकडेच मी एक घर बांधलं होतं. त्यातच एका जवळच्या व्यक्तीकडून झालेला विश्वासघात मला मानसिकदृष्ट्या खूपच डगमगवून गेला. अशा वेळी आलेला हा जॅकपॉट खरंच आयुष्य वाचवणारा ठरला.’’