नवी मुंबई : प्रतिनिधी
महापे येथे सुरु असलेल्या कॉलसेंटरमधून दिवसा भारतीयांवर तर रात्री अमेरिकेतल्या नागरिकांवर सायबर हल्ला करणारे कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. आरोपी नागरिकांच्या संगणक, लॅपटॉपमध्ये आधी स्वत:च बिघाड करून संपर्कासाठी नंबर द्यायचे. त्यावर तक्रार प्राप्त होताच बिघाड दुरुस्त करून त्याच्या मोबदल्यात पैसे घेतले जात होते.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या आडून भारतीयांच्या खिशाला कात्री लावणारे कॉल सेंटर नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने उघड केले. दिवसा ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीला भाग पाडण्यासाठी भारतभर फोन, मॅसेज केले जायचे, तर रात्री अमेरिकन वेळेनुसार अमेरिकेतल्या नागरिकांच्या लॅपटॉप, संगणक यांच्यावर सायबर हल्ला करून ते बंद पाडले जायचे. त्याशिवाय झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी हेल्पलाइन नंबरही स्क्रीनवर सोडला जायचा. संबंधित नंबरवर अमेरिकन नागरिकांनी संपर्क साधताच स्वत:ला मायक्रोसॉफ्ट कर्मचारी भासवून त्यांच्या लॅपटॉप, संगणकमधला बिघाड दुरुस्त करण्याचे पैसे घेतले जायचे.
६१ बँक खात्यांचा वापर : वेल्थ ग्रोथ, कॅपिटल सर्व्हिस, सिग्मा, ट्रेंड नॉलेज, स्टॉक व्हिजन या नावाने कंपन्या स्थापन करून हे कॉल सेंटर चालवले जात होते. गुंतवणूक करण्यास भाग पाडण्यासाठी कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले होते. गुन्ह्यात वापरलेल्या ७१ बँक खात्यांची माहिती उघड झाली असून, त्यापैकी ६१ खात्यात १२ कोटी २९ लाखांचा व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. खात्यांविरोधात एनसीसीआरपी पोर्टलवर ३१ तक्रारी मिळाल्या.

