गरज गरज आज मेघ, घनन घनन छायो रे ।
चमक चमक बिजुरी चमके, कहत रे, ऋतुराज आयो रे।
भारत आणि पाकिस्तानच्या आकाशात युद्धाचे ढग ‘गरजत’ असताना सोमवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या बॅटने धावांची बरसात केली. त्याचे शतकी वादळ असे काही घोंघावले की त्याच्या तडाख्यात अनेक जागतिक विक्रम भुईसपाट झाले आणि नवे विक्रम प्रस्थापित झाले. वैभवने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत युवा शतकवीर ठरताना ३८ चेंडूंत १०१ धावांची तुफानी खेळी साकारली. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगवान शतक वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३० चेंडूंत शतक ठोकले होते. त्यानंतर ३८ चेंडूंत शतकी मजल मारून भारताच्या युसूफ पठाणने दुसरा क्रमांक पटकावला होता. सोमवारी वैभवने पठाणचा विक्रम खालसा करत अवघ्या ३५ चेंडूंत शतक झळकावले आणि सर्वाधिक वेगवान शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला. आपल्या शतकी खेळीत त्याने ७ चौकार आणि ११ षटकार ठोकले. बिहारमध्ये जन्मलेल्या वैभवच्या ओठावर अजून मिसरूड फुटलेले नाही, त्याचे ओठ पिळले तर दूध गळेल की काय अशी स्थिती, चेह-यावर अत्यंत निरागस, निष्पाप असे भाव परंतु या पोराच्या हातात राक्षसी ताकद आहे. त्याच्या बॅटचा झपाटा पाहून गोलंदाजांना तो अतिरेक्यासारखा भासत असेल. यंदाच्या आयपीएलमध्ये ‘एक बिहारी, सौ पे भारी’ ठरतोय यात शंका नाही.
आयपीएलमधील त्याचा हा तिसराच सामना होता. पहिल्या सामन्यात तिसेक धावा काढून वैभव बाद झाला तेव्हा तंबूकडे परतताना त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. गुजरातविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करून तंबूकडे जाताना सुद्धा तो अश्रू गाळत होता, हे अश्रू आनंदाचे असले तरी त्याला थोडी दु:खाची किनार होती. ती यासाठी की शतक झळकल्यानंतर अख्ख्या स्टेडियमने उभे राहून मानवंदना दिली होती, वैभवचे कोच ‘द वॉल’ राहुल द्रविडही उभे राहून दाद देत होते. उभे राहताना द्रविड थोडेसे अडखळले, कारण त्यांचा पाय फ्रॅक्चर होता. वैभवचे अश्रू त्यासाठी होते. अवघ्या तीन सामन्यांत वैभवने आपल्या बिहार राज्याचे नाव रोशन केले आहे. जनावराचा चारा खाणारे राज्य म्हणून ज्या राज्याची नाचक्की झाली होती, त्या बिहारला अभिमान वाटावा अशी कामगिरी वैभवने करून दाखवली आहे. वैभवच्या वयाबद्दल अनेक जण संशय व्यक्त करतात, तो १४ वर्षांचा नसून २२ वर्षांचा असावा अशी शंकाही व्यक्त करतात.
परंतु या वयात त्याने आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध आपल्या फटक्यातून जे सिलेक्शन आणि टायमिंग दाखवले आहे ते अफलातूनच म्हणावे लागेल. त्याला ती दैवी देणगी आहे असे म्हणावे लागेल. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासून त्याने आक्रमक धोरण स्वीकारले आणि अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतकाची वेस ओलांडली. आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला. नंतर केवळ १८ चेंडूंत त्याने शतकी मजल मारली. आयपीएलमध्ये आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना तोंड देणे म्हणजे पोरासोराचे काम नाही. नाही तरी १४ वर्षांच्या वयात भारतीय मुलं काय करत असतील? एकतर परीक्षेची तयारी करत असतील, वैभवसारखी शतक ठोकत असतील आणि पाकिस्तानातील मुलं अतिरेकी बनत असतील! म्हणजे हा संस्कार आणि संस्कृतीतील फरक म्हणावा लागेल. सध्या पांढ-या चेंडूच्या क्रिकेटची चलती आहे. मर्यादित षटकांचे, टी-२० क्रिकेट अतिशय लोकप्रिय आहे. युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या हातात भारतीय क्रिकेटचे ‘वैभव’ सुरक्षित आहे यात तिळमात्र शंका नाही.
डावखुरे युवा क्रिकेटपटू तर अक्षरश: ‘छा गये है’ असेच म्हणावे लागेल. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, देवदत्त पडिक्कल, ईशान किशन या तरुणाईने कहर मांडला आहे. टी-२० मध्ये तुमच्या तंत्राला महत्त्व नाही, तुम्ही कशा आणि किती धावा काढता याला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे काही जण या क्रिकेट प्रकाराला नाके मुरडतात. परंतु आजच्या धावत्या जगात चमत्काराला नमस्कार करतात….. त्यामुळे नाइलाजाने का होईना आपल्याला नमस्कार करावा लागतोच. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर एक नवा तारा उदयास आला आहे, त्याचे नाव वैभव सूर्यवंशी. १४ वर्षांच्या वैभवने क्रिकेटच्या मैदानावर अशी काही जादू दाखवली की सध्या क्रिकेट विश्वात त्याच्याच नावाची चर्चा आहे. बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर गावात एका शेतकरी कुटुंबात वैभवचा जन्म झाला. अवघ्या चौथ्या वर्षापासूनच त्याला क्रिकेटचे वेड लागले. वडील संजीव सूर्यवंशी यांनी त्याच्या क्रिकेटच्या स्वप्नांना पंख दिले. कुटुंबाने आर्थिक अडचणींना तोंड देताना वेळप्रसंगी जमीनही विकली, पण वैभवच्या प्रतिभेला खुलवण्यासाठी त्यांनी कधीच माघार घेतली नाही. वैभवने स्थानिक क्रिकेटमध्ये चमक दाखवली. वयाच्या १२ व्या वर्षी रणजी ट्रॉफीत तर १३ व्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीत पदार्पण केले.
आयपीएल २०२५च्या लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १ कोटी १० लाख रुपये खर्चून आपल्या ताफ्यात सामील केले तेव्हा तो आयपीएल करार मिळवणारा सर्वांत कमी वयाचा (१३ वर्षे) खेळाडू ठरला. वैभवने आयपीएलच्या पदार्पणात लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि गुजरात टायटन्सविरुद्धच्या आपल्या तिस-याच सामन्यात शतकी मजल मारताना राशीद खानच्या चेंडूवर षटकार मारला. वैभवच्या शतकी खेळीचे कौतुक गुजरातच्या खेळाडूंनीसुद्धा केले. वैभवकडे अफाट प्रतिभा आहे, आता त्याने दीर्घकालीन करिअरवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्याच्यावर अपेक्षांचा दबाव आहे पण मानसिक ताकद आणि प्रतिभेच्या जोरावर त्याला दबाव झुगारून देता येईल. वैभवचे कौतुक करताना मास्टर ब्लास्टर म्हणतो- वैभवचा निडर दृष्टिकोन, बॅट स्विंग, चेंडूचा टप्पा साधण्याचे कसब आणि चेंडू ठोकताना लावलेली ताकद, त्याच्या सुंदर खेळीचा मंत्र होता. ‘गरज गरज आज मेघ’च्या शेवटच्या ओळीत थोडासा बदल करून म्हणता येईल- ‘कहत रे, वैभव आयो रे’!