28.7 C
Latur
Saturday, February 14, 2026
Homeराष्ट्रीयभारतीय पासपोर्टची रँकिंग ५ अंकांनी सुधारली

भारतीय पासपोर्टची रँकिंग ५ अंकांनी सुधारली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय पासपोर्टच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. नवीनतम हेनले पासपोर्ट इंडेक्स (फेब्रुवारी २०२६) नुसार आता भारताचा पासपोर्ट जगातील सर्वांत शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत ७५ व्या स्थानावर पोहोचला आहे. वर्षाच्या सुरुवातीला तो ८० व्या स्थानावर होता. म्हणजेच अलीकडे त्यात ५ स्थानांची सुधारणा झाली आहे. तत्पूर्वी २०२५ मध्ये तो ८५ व्या स्थानावर होता. भारतीय पासपोर्टने वर्षभरात एकूण १० स्थानांची झेप घेतली.

हेनले पासपोर्ट इंडेक्स जगभरातील सुमारे २०० देशांच्या पासपोर्टला क्रमवारी देतो. ही क्रमवारी यावर आधारित असते की, त्या देशाचे पासपोर्टधारक किती देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हलसह जाऊ शकतात. भारतीय पासपोर्टधारकांना आता ५६ देशांमध्ये व्हिसा-फ्री किंवा व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा मिळते. ही क्रमवारी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या प्रवासाच्या आकडेवारीवर आधारित तयार केली जाते.

या इंडेक्समध्ये पाकिस्तानी पासपोर्ट ९७ व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानची स्थिती पॅलेस्टाईन (९१), उत्तर कोरिया (९४) आणि सोमालिया (९६) पेक्षाही नीच्चांकी स्तरावर आहे. नवीन रँकिंगमधील सुधारणेचा अर्थ भारतीय नागरिकांसाठी परदेश प्रवास पूर्वीपेक्षा सोपा झाला आहे. सुट्या, व्यवसाय आणि सांस्कृतिक प्रवासासाठी आता अधिक सुविधा मिळतील. आशिया, कॅरिबियन, आफ्रिका आणि ओशनियामधील अनेक देश भारतीयांना सोप्या व्हिसा सुविधा देत आहेत.

भारताची रँकिंग गेल्या दहा वर्षांत सतत वर-खाली होत राहिली. २००६ मध्ये भारत ७१ व्या स्थानावर होता, जी त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम स्थिती होती. त्यानंतर रँकिंग घसरत गेली आणि गेल्या वर्षी ती ८५ व्या स्थानावर पोहोचली होती. २०२६ च्या सुरुवातीला भारत ८० व्या स्थानावर आला आणि आता ७५ व्या स्थानावर पोहोचला. मजबूत पासपोर्ट म्हणजे त्या देशाचे नागरिक अधिक देशांमध्ये आधीपासून व्हिसा न घेता प्रवास करू शकतात. अशा पासपोर्टवर व्हिसा-मुक्त, व्हिसा-ऑन-अरायव्हल किंवा ई-व्हिसाची सुविधा मिळते. व्हिसासाठी कमी कागदपत्रे आणि कमी प्रतीक्षा करावी लागते. यामुळे परदेशात फिरणे, शिक्षण घेणे किंवा व्यावसायिक प्रवासाला जाणे सोपे होते.

इंडेक्समध्ये सिंगापूर
पहिल्या स्थानावर
२०२६ च्या क्रमवारीत सिंगापूर पहिल्या स्थानावर आहे. सिंगापूरच्या पासपोर्टने १९२ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवास करता येतो. दुस-या स्थानावर जपान आणि दक्षिण कोरिया आहेत, ज्यांचे नागरिक १८७ देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात. तिस-या स्थानावर स्वीडन आणि यूएई आहेत, जिथून १८६ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळतो. चौथ्या स्थानावर बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, लक्झेंबर्ग, स्पेन, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स आणि नॉर्वे आहेत, ज्यांच्या पासपोर्टने १८५ देशांमध्ये आधीपासून व्हिसा न घेता प्रवास करणे शक्य आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR