22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरभारतीय साहित्य वैश्विक पातळीवर झळकावे

भारतीय साहित्य वैश्विक पातळीवर झळकावे

लातूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्यपूर्व काळापासून पार्श्वभूमी लाभलेली साहित्य अकादमी ही जास्तीत-जास्त लोकाभिमुख झाली पाहिजे आणि साहित्य अकादमीमार्फत उच्च दर्जाचे सृजनशील साहित्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले पाहिजे. साहित्य अकादमीची चळवळ अधिकाधिक वृद्धिंगत झाली पाहिजे. भाषांतर, अनुवादाच्या माध्यमातून भारतीय साहित्य वैश्विक पातळीवर झळकले पाहिजे, यासाठी ती अविरतपणे कार्यरत आहे.अशा या साहित्य अकादमीच्या भारतीय साहित्य, समकालीन साहित्य व संस्कृत प्रतिभा या जर्नल्समधील दर्जेदार लेखनाचे वा इतर साहित्याचे वाचन करून वाचनसंस्कृतीची जोपासणा केली पाहिजे. मराठी लेखकांनी आपापले दर्जेदार व सकस साहित्य इंग्रजी, हिंदी भाषेमध्ये भाषांतर करून घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचे सदस्य डॉ.नरेंद्र पाठक यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयातील मराठी भाषा व वाड्मय विभाग आणि संशोधन केंद्राच्या वतीने शिक्षक, प्राध्यापक, संशोधक,अभ्यासक व लेखक, कवींसाठी ‘साहित्य अकादमीच्या विविध योजना आणि वाड्मयीन उपक्रम उद्बोधन कार्यशाळे’ चे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड होते.

साहित्य अकादमी ही भारतातील भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी वाहिलेली संस्था असून या संस्थेकडून लेखन, संशोधन, अनुवाद, विविध साहित्यप्रकारातील कलाकृती यासाठी पुरस्कार व अनुदान दिले जात असल्याचे सांगून डॉ. पाठक म्हणाले की, साहित्य अकादमीतर्फे विविध वाड्मयीन उपक्रम, कार्यशाळा, परिसंवाद, सेमिनार यांचे सातत्याने आयोजन केले जाते. साहित्य अकादमी ही दरवर्षी २४ प्रमुख भारतीय भाषांपैकी उल्लेखनीय कार्य करणा-या नवोदित तरूण लेखकांना युवा पुरस्कारही देते. प्रकाशन, पुरस्कार आणि प्रोत्साहन देणे हे साहित्य अकादमीचे कार्य आहे. साहित्य अकादमी ही दिल्ली, मुंबई, कलकत्ता, चेन्नई व बेंगलोर अशा विविध ठिकाणातील कार्यालयाच्या माध्यमातून ग्रंथ प्रकाशन, काव्य संमेलन, नारी चेतना, आविष्कार, कथाकथन, ट्रॅव्हल ग्रँट, दिव्यांगाना संधी आणि विविध शिष्यवृत्ती दिल्या जातात.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, दयानंद शिक्षण संस्था व महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थी, प्राध्यापक यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम व कार्यशाळेचे आयोजन केले जाते. साहित्य, संगीत, कला, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी, आर्थिक पाठबळ देणारी, दुरदृष्टीने विचार संस्थेच्या व महाविद्यालयाच्या माध्यमातून दिग्गज साहित्यिक व आदर्श नागरिक निर्माण झाले पाहिजेत. साहित्य अकादमीच्या विविध योजनांचाही लाभ घेऊन दर्जेदार नवोदित लेखक अशा कार्यशाळेतून उदयाला आले पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजकुमार मोरे यांनी केले. डॉ. सुभाष कदम यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. सुनीता सांगोले, प्रा. शिवाजी मोतीबोणे, डॉ. वैशाली बेटकर यांच्यासह विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध जिल्ह्यातील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, मार्गदर्शक, अभ्यासक, साहित्यिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR