30.3 C
Latur
Monday, April 28, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय सैन्य दल सज्ज

भारतीय सैन्य दल सज्ज

संरक्षणमंत्री पंतप्रधानांना भेटले, तिन्ही दलांच्या तयारीची दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. या हल्ल्यास जशात तसे उत्तर द्यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे भारत सरकारनेही पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली असून, प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननेही भारताविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. मात्र, भारताने पाकिस्तानवर अधिक दबाव वाढवला आहे. त्यातच आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत तिन्ही सैन्य दलाच्या तयारीची माहिती दिली असून, भारतीय भूदल, नौदल आणि वायू दलही सज्ज असल्याचे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यामुळे पाकिस्तानातही वेगवान हालचाली सुरू आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांना मातीत गाडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत भारतीय सैन्याच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. सूत्रांच्या माहितीनुसार भारताची भूदल, नौदल आणि वायूदल अशी तिन्ही दले सज्ज आहेत, असे राजनाथ सिंग यांनी मोदी यांना सांगितले. त्यामुळे आता मोदी सरकार पाकिस्तानविरोधात काय निर्णय घेते, याकडे लक्ष असणार आहे.
सीमेवर गस्त, सैनिक
संख्या वाढविली
भारताने आपली तिन्ही दले सज्ज ठेवली आहेत. या तिन्ही दलांकडून आपापल्या पद्धतीने युद्धाभ्यास केला जात आहे. दुसरीकडे भारत-पाकिस्तान सीमेवरही गस्त आणि सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानने काही कुरापती केल्याच तर त्याला जशास तसे उत्तर देण्याची तयारी भारताने ठेवली आहे. सध्या तरी भारताने सबुरीची भूमिका घेतली आहे. अशात पाकिस्तानने दगाबाजी केल्यास युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.
……………….
हल्लेखोर खो-यातच,
लष्कराकडून पाठलाग
पहलगाममध्ये हल्ला केलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग भारतीय लष्कराकडून केला जात आहे. गेल्या ५ दिवसात ४ वेळा त्यांचे लोकेशन लष्कराने शोधून काढले. चारही वेळा हे दहशतवादी दाट जंगलातून पळाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हल्लेखोर अजूनही काश्मीरच्या खो-यात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काश्मीरच्या या दाट जंगलात सध्या या दहशतवाद्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.
………………………
पाकला हल्ल्याची भीती
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी कारवाईची चांगलीच धास्ती घेतली असून, पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांना लॉंच पॅड येथून हटवून सुरक्षितस्थळी पाठवायला सुरुवात केली आहे. बहावलपूर येथील जैश-ए-मोहमद आणि मुनीरके येथील लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयातून अतिरेक्यांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये अतिरेक्यांना वाचविणे हे पाकसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मिरात अतिरेकी गबाळ गुंडाळत असल्याचे चित्र आहे.

पाकिस्तान संरक्षणमंत्री
म्हणतात आम्ही सज्ज
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी आम्ही आमच्या सेनेची मोर्चेबांधणी केली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीस तयार आहोत. भारतीय सैनिक कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतात, असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR