मोहाली : वृत्तसंस्था
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले आहे. अंतिम सामन्यात जपानचा ४-१ असा पराभव करत भारताने विक्रमी सहाव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे भारताने सलग तिस-यांदा ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केला. मोहाली येथील ऑलिम्पियन बलबीर सिंग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले.
सामन्याच्या तिस-याच मिनिटाला काझुमासा मात्सुमोतोने गोल करत जपानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, तिस-या क्वॉर्टरपर्यंत जपानने आपली आघाडी कायम ठेवली. अखेर शिलानंद लाक्राने गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली. ४८ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जुगरेज सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. विवेक सागर प्रसादने आणखी एक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
एकही सामना
न गमावता यश
भारताने स्पर्धेच्या साखळी फेरीतील पाचही सामने जिंकले होते. उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा ८-१ असा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. आता जपानला नमवत भारताने आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताने यापूर्वी २०११, २०१६, २०१८, २०२३ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. आता २०२६ मध्ये सहाव्यांदा विजेतेपद मिळवत भारताने नवा विक्रम केला.
















