कोल्हापूर : प्रतिनिधी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा, बहुप्रतीक्षित भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा केली. याअंतर्गत भारतावर लादण्यात आलेला करही १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दरम्यान आता भारत अमेरिकेकडून अनेक वस्तू खरेदी करणार आहे. दरम्यान, आता या करारावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी टीका केली.
‘‘हा व्यापार करार मंजूर झाला, तर भारतातील शेतकरी आणि दुग्धोत्पादकांचे कंबरडे मोडेल. हा करार म्हणजे थेट भारतीय शेतक-याच्या मृत्यूला दिलेली संमती आहे,’’ असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले की, या करारामुळे अमेरिकन शेतक-यांनी उत्पादित केलेला मका, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ, कापूस आदी उत्पादने मोठ्या प्रमाणावर भारतात आयात केली जातील. परिणामी, देशातील शेतक-यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार नाही आणि देशांतर्गत बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. ‘‘अमेरिकन शेतीला मोठ्या प्रमाणात सबसिडी मिळते. अशा परिस्थितीत भारतीय शेतकरी स्पर्धा कशी करणार?’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या कराराचा सर्वाधिक फायदा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना होणार असल्याचा आरोप करत शेट्टी म्हणाले, ‘‘हा करार मुकेश अंबानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यासारख्या उद्योगसमूहांना लाभदायक ठरेल. मात्र भारतीय साखर उद्योग, दुग्धव्यवसाय आणि लघु शेतकरी पूर्णपणे मोडून पडतील.’’
यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आमच्या ‘५६ इंच छातीच्या’ पंतप्रधानांनी नांगी टाकून या करारावर सही केली, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,’’ असा आरोप त्यांनी केला. हा करार देशहिताचा नसून परदेशी आणि कॉर्पोरेट हितसंबंध जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले, हा करार मंजूर झाला तर आता डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात बोलावून एकदा भारतीय शेतक-याचे श्राद्ध घालणे एवढेच बाकी राहील, अशा तीव्र शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
या मुद्यावर शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याची गरज असल्याचे सांगत, राजू शेट्टी यांनी देशभरातील शेतक-यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. ‘‘हा करार मागे घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात भारत आणि अमेरिका यांच्यातील कराराची जागतिक पातळीवर चर्चा आहे. या कराराचे चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी २ दिवस लागतील. परंतु या कराराचा परिणाम भारतीय कृषि उत्पादनावर होण्याची शक्यता आहे असे सांगत शरद पवारांनी करारावर चिंता व्यक्त केली. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, जागतिक पातळीवर अमेरिकेने भारतावर जे कर आकारले होते त्यात काही प्रमाणात कर कपातीचा निर्णय घेतला आहे. मला काही गोष्टींची चिंता आहे. अमेरिका आणि भारतातील या नव्या कराराचे स्पष्ट चित्र आणखी २ दिवसांत देशासमोर येईल. त्यानंतर त्यावर सविस्तर भाष्य करणे योग्य होईल. परंतु आज जे लोकांसमोर अमेरिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला निर्यात करता येईल अशी तरतूद आहे. ही तरतूद भारतातील कृषी क्षेत्राच्या दृष्टीने चिंता करण्यासारखी आहे. अमेरिका हा शक्तिशाली देश आहे. आर्थिक ताकद त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या क्षेत्रातील उत्पादनाची निर्यात इतर देशात करायची ठरवली तर त्या देशाच्या त्या क्षेत्रातील उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले.

