टेक्सास : वृत्तसंस्था
भारत हा एक विचार आहे आणि आम्हाला वाटते की, भारत हा अनेक विचारांचा देश आहे. तसेच प्रत्येकाला यामध्ये सहभागी होण्याची, स्वप्न पाहण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि त्यांची जात, भाषा, धर्म, परंपरा विचारात न घेता जागा दिली पाहिजे, असे टेक्सासमधील कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
टेक्सास येथे आयोजित कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढे म्हणाले की, ही लढाई २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट झाली जेव्हा भारताच्या लाखो लोकांना समजलं की, पंतप्रधान भारताच्या संविधानावर हल्ला करत आहेत. मी तुम्हाला जे काही सांगितलं ते संविधानात आहे. आधुनिक भारताचा पाया संविधान आहे. हेच लोकांना निवडणुकीत स्पष्टपणे समजलं आणि मी ते घडताना पाहिलं.
जेव्हा मी संविधानाबाबत बोलायचो, तेव्हा लोकांना मी काय म्हणतोय ते समजत होतं. ते म्हणत होते की, भाजप आमच्या परंपरेवर हल्ला करत आहे. आमच्या भाषेवर हल्ला करत आहे. आमच्या राज्यांवर हल्ला करत आहे. त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली ती होती की, ती म्हणजे जो कोणी भारताच्या संविधानावर हल्ला करत आहे ते आपल्या धार्मिक परंपरेवरही हल्ला करत आहेत.
आपल्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी संसदेतील माझ्या भाषणात अभयमुद्राचे वर्णन केले तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की ते निर्भयतेचे प्रतिक आहे आणि ते प्रत्येक भारतीय धर्मात आहे. मी हे सांगत होतो तेव्हा भाजपला ते सहन होत नव्हते. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे लोकांतून भाजपची भीती नाहीशी झाली.