अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शस्त्रसंधीशी संबंध नाही : मिस्री
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शस्त्रसंधीचा करार हा फक्त भारत आणि पाकिस्तानमध्येच झालेला आहे. या शस्त्रसंधीशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीबद्दल केलेला दावा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी फेटाळून लावला.
भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा शस्त्रसंधीतील सहभागी, तुर्कीसोबतचे तणावपूर्ण संबंध यासह इतर मुद्यांवर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर महत्त्वाची माहिती सादर केली. संसदेच्या स्थायी समितीची परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मिस्री यांनी शस्त्रसंधीबद्दल अनेक मुद्दे अधोरेखित केले. यावेळी पाकिस्तानने अणवस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती का, यावर उत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या कुठल्याही अण्वस्त्र तळावर हल्ला केला नाही आणि पाकिस्तानने अण्वस्त्र हल्ल्याची भारताला कसलीही धमकी दिली नव्हती, असेही मिस्री म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध हे पारंपरिक युद्ध होते. त्यामध्ये कुठल्याही अण्वस्त्र युद्धाची धमकी देण्यात आली नव्हती, असे ते म्हणाले.
दहशतवादी पाकमध्ये
खुलेआम फिरतात
संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले दहशतवादी खुलेआम पाकिस्तानमध्ये फिरत आहेत. भारतविरुद्ध सातत्याने दहशतवादी कारवाया करत आहेत. पहलगाम हल्ल्यातील तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या आकासोबत संपर्क केला होता, असेही मिस्री म्हणाले.