दुबईत पारंपरिक लढतीचा थरार, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने सुरू झाले आहेत. दुबईत भारताने बांगलादेशविरुद्धचा पहिला सामना जिंकला. भारत-पाकमधीलच नव्हे तर जगातील क्रिकेट रसिकांसाठी स्पर्धेतील महत्त्वाचे आकर्षण असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट संघाचा सामना रविवारी होणार आहे. रविवारी दुपारी २.३० वाजता हा सामना सुरू होईल. या हायव्होल्टेज सामन्याची उत्सुकता सर्वांनाच असते. ब-याच दिवसांनी या दोन संघातील लढतीचा थरार पाहायला मिळणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणा-या सामन्यासाठी दुबई सज्ज झाली आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान पलटवार करत टीम इंडियाविरुद्ध विजयाचे खाते उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहे तर टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानवर मात करत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याकडे सा-या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.
भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत केले तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला पुढील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताविरुद्ध उद्या होणारा सामना जिंकणे आवश्यक आहे. कारण पाकने हा सामना गमावला तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास अशक्य ठरणार आहे. तथापि, बलाढ्य भारतीय संघाला हरवणे वाटते तितके सोपे नाही. त्यामुळे उद्याची लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
भारताची दुबईतील आकडेवारी
दरम्यान टीम इंडियाने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळलेल्या ७ पैकी ६ सामन्यांत विजय मिळवला आहे तर फक्त एकदाच पराभवाचा सामना करावा लागला. तसेच टीम इंडियाने ६ पैकी ५ सामने हे विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत.