नवी दिल्ली : वृत्तसंस्था
इस्रायलच्या तंत्रज्ञानाची तोड नाहीय, बंद असलेला मोबाईलही शोधू शकतील असे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. हवी ती यंत्रणा ते मोडीत काढून तिच्याद्वारे ते जगात कुठेही हाहाकार उडवू शकतात. नुकतेच झालेले पेजर अॅटॅक असतील किंवा शत्रू देशात लपलेल्या हमासच्या कमांडरला मिसाईल डागून मारणे असेल, मोसादचा हात कोणीच धरू शकलेला नाहीय. इस्रायल हा भारताचा मित्र असला तरी तो सध्या भारतासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. आपली ठिकाणे लपविण्यासाठी इस्रायल जीपीएस सिस्टीमवर एका मागोमाग एक हजारो हल्ले करत आहे. परंतू, त्याचा फटका अमृतसर, जम्मू काश्मीरसारख्या अत्यंत संवेदनशील असलेल्या भारत-पाक सीमेवर जाणवू लागला आहे.
नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या अवघ्या १५ महिन्यांत इस्रायलच्या जीपीएस हल्ल्यांमुळे विमाने प्रभावित झाल्याची तब्बल ४६५ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश हल्ले हे अमृतसर आणि जम्मू काश्मीरच्या पाक सीमेवर झाले आहेत. विमानांच्या नेव्हिगेशन सिस्टीमवर हा हल्ला केला जात आहे. जी भारत-पाकमध्ये युद्ध देखील भडकवू शकते.
इस्रायल जीपीएस स्पूफिंग करत आहे. ही अशी प्रक्रिया आहे जी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम रिसिव्हरला फसविते. यासाठी बनावट सिग्नल पाठविले जातात. इस्रायल हे करत असल्याने जगाला धोका आहेच परंतू याचा भारताला मोठा धोका सतावत आहे. यामुळे विमानांना चुकीची माहिती मिळते, त्यांना चुकीच्या दिशेने जाण्यास सांगितले जाते. रिअल टाईम डेटा मिळत नाही, यामुळे एखादे विमान चुकून भारतासाठी बंद असलेल्या पाकिस्तानी हवाई हद्दीत जाऊ शकते. हे विमान प्रवासी किंवा सैन्याचे देखील असू शकते. यामुळे युद्धाचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
युरेशियन टाईम्सनुसार ओपीएस ग्रुपद्वारे सप्टेंबर २०२४ मध्ये एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये जीपीएस स्पुफिंग करणारी ठिकाणे ही उत्तर-पश्चिम दिल्ली आणि लाहोरच्या आजुबाजुला आहेत. १५ जुलै ते १५ ऑगस्ट २०२४ या काळात जगात हे क्षेत्र नवव्या स्थानी आहे, यामुळे ३१६ विमाने भरकटली होती. भूमध्य सागर, काळा सागर आणि आशिया आता हॉट स्पॉट बनू लागला आहे. या भागातून जाणारी विमाने नेहमी जीपीएस जॅम झाल्याची तक्रार करत असतात.
इस्रायल का करतोय असे…
इस्रायल असे का करतोय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जीपीएस स्पुफिंग करून इस्रायल शत्रूच्या ड्रोन, लढाऊ विमाने आणि मिसाईल सारख्या शस्त्रांना चुकीच्या दिशेने वळविण्याचा डाव खेळत आहे. यासाठी जीपीएसमध्ये काही काळासाठी बदल केले जातात. यामुळे यांची टार्गेट चुकतात आणि हल्ला फोल ठरतो. परंतू, याचा फटका भारतासह लेबनान, सिरीया, जॉर्डन, रशिया आणि तुर्कीसारख्या देशांना बसत आहे.