लंडन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ब्रिटन यांच्यात फ्री ट्रेड ऍग्रीमेंटबाबत ९० टक्के सहमती झाली आहे. ब्रिटनसोबत १२८ दशलक्ष पाउंडचा नवीन निर्यात करार करण्यात आला आणि गुंतवणुकीच्या घोषणाही झाल्या.
ब्रिटन सरकार भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्येच्या देशासोबत या वर्षातच या व्यापार भागीदारीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आशावादी आहे. या करारावर चर्चा जवळपास पूर्ण झाल्याचे कळते. दरम्यान, व्हिसा संबंधित मुद्दाही ब-याच अंशी सुटला आहे आणि आता व्हिस्की, कार्स आणि औषधांवरील (फार्मास्युटिकल्स) टॅरिफबाबत चर्चा होणार आहे.
लंडनमध्ये आयोजित १३ व्या ‘इकॉनॉमिक ऍण्ड फायनान्शियल डायलॉग’मध्ये दोन्ही देशांनी आपापसातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी फ्री ट्रेड ऍग्रीमेंट आणि द्विपक्षीय गुंतवणूक करार यावर चर्चा पुढे नेण्याची वचनबद्धता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ब्रिटनच्या चॅन्सलर ऑफ एक्सचेकर रेचेल रीव्ह्स यांनी भूषवले.
दरम्यान, व्हिसासंबंधी वादग्रस्त मुद्दा मोठ्या प्रमाणात सुटल्याची माहिती आहे. आता उर्वरित चर्चा व्हिस्की, कार आणि फार्मास्युटिकल्सवरील टॅरिफसंदर्भात होणार आहे. जर यावरही सहमती झाली, तर भारतातून ब्रिटनमध्ये निर्यात होणा-या स्कॉच व्हिस्की आणि कार्ससाठी टॅरिफ कमी केला जाऊ शकतो.