शिर्डी : प्रतिनिधी
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक झाल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यातील फसवणुकीचे मूळ म्हणजे कोणत्याही वस्तूवर एमआरपी आणि एक्सपायरी नाही. तसेच यामुळेच या माध्यमातून भाविकांची लूट केली जात आहे. या विषयात आता शिर्डी नगरपंचायत प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून, धोरण ठरवत एमआरपी सक्ती केली जाणार आहे. आपण शिर्डीत नाही तर इतर कुठेही देवदर्शनासाठी गेलात तर देवाला चढवण्यासाठी फूल-प्रसाद खरेदी करता.
भक्ती आणि श्रद्धेपोटी ही खरेदी करताना भाविक आपल्या खिशाकडे पाहत नाही. तर भावेल ती वस्तू खरेदी करून देवाला अर्पण करतात आणि याचाच फायदा काही व्यावसायिक घेतात. इतर देवस्थानांप्रमाणेच साईबाबांच्या शिर्डीला प्रसाद भांडाराची परंपरा लाभलीय. पिढ्यान्पिढ्या येथे फूल-प्रसादाचा व्यवसाय जोमात केला जात आहे. वर्षाकाठी साधारण १०० कोटी रुपयांची उलाढाल या माध्यमातून होत आहे.
कमिशन एजंटगिरी व्यवसाय आता लुटीकडे झुकलाय शिर्डीत मंदिराच्या आसपास फुले-प्रसादाची अनेक दुकाने थाटली गेली आहेत. यात दुकानमालक होलसेल पद्धतीने रेवडी, मखाना, गोड काजू, खडीसाखर, मुरमुरे, फुटाणे, पेढे अशा वस्तू खरेदी करतात आणि त्याचे लहान लहान पॅकेट करून रिटेलमध्ये भाविकांना विकतात. यावेळी मात्र यावर कोणत्याही प्रकारची एमआरपी नसते.
त्यामुळे भाविकांना दुकानावर घेऊन जाणारा कमिशन एजंट अर्थात पॉलिशवाला चढ्या भावाने आणि अव्वाच्या सव्वा भाव लावत त्या वस्तू भाविकांना विकतात आणि यादरम्यानच भाविकांची लूट होते. पेढा-प्रसादासारख्या मालाच्या पॅकेटवर त्याचे वजन, गुणवत्ता, एमआरपी आणि एक्सपायरी सक्तीची केली जाणार असल्याचे शिर्डी नगर परिषदेने स्पष्ट केले आहे. यासाठी आता चाचपणी केली जात असून, लवकरच यासंबंधीचे धोरण ठरवण्यात येणार आहे.