गुदमरून अनेकजण जखमी, महिला, लहान मुलांचा समावेश
नवी दिल्ली : प्रयागराज येथील महाकुंभाला जाणारी ट्रेन शनिवारी रात्री नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर येत असताना भाविकांची गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत गुदमरून अनेक महिला प्रवासी आणि लहान मुले बेशुद्ध पडले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरीत १५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मात्र, रेल्वे विभागाने याचा इन्कार केला आहे.
नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्र. १४ वर प्रयागराज रेल्वे थांबली होती. त्यातच स्वतंत्रता सेनानी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशिरा धावत असल्याने प्रवासी प्लॅटफॉर्म क्र. १२, १३ आणि १४ वर होते. त्याचवेळी प्रयागराज गाडी लागल्याने प्रयागराजला येणा-या भाविकांची गर्दी उसळली. त्यामुळे प्लॅटफॉर्म नं. १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली. यात महिला आणि लहान मुले जमिनीवर कोसळली. त्यावरून प्रवासी धावू लागल्याने अनेकजण गुदमरून बेशुद्ध पडले. त्यामुळे ८ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच १५ जणांचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे. परंतु रेल्वे विभागाने चेंगराचेंगरीचे वृत्त फेटाळून लावले आहे.
स्थिती नियंत्रणात
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करीत नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर स्थिती नियंत्रणात असून, दिल्ली पोलिस आणि आरपीएफचे जवान पोहोचले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत, असे म्हटले.